आंदोलन शांततेत करा : जिल्हा प्रशासन, पोलिसांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:53 AM2018-08-08T11:53:56+5:302018-08-08T11:55:22+5:30
आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.
अहमदनगर : आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.
मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सकल मराठा मोर्चा समितीच्या सदस्यांशी चर्चा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. राज्य शासनाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका त्यांना समजावून सांगितली. यावेळी सकल मराठा मोर्चा समितीचे सदस्य संभाजी दहातोंडे, गोरख दळवी, बाळासाहेब पवार, शिवाजीराव कराळे, अनुराधा येवले यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शेख आदी उपस्थित होते. द्विवेदी म्हणाले की, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाला सहकार्य करणे आणि जिल्ह्यातील शांततामय वातावरण बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. या आंदोलनात बाह्य शक्ती घुसणार नाहीत, याची दक्षताही आंदोलकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासन तुमची भूमिका निश्चितपणे राज्य शासनापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे आंदोलन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी झालेले मराठा क्रांती मोर्चा व इतर आंदोलने शांततामय मार्गाने झाले आहेत त्यामुळे ९ आॅगस्टचे आंदोलनही शांततामय पद्धतीने करावे. जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात १५० अधिकारी, दोन हजार पोलीस कर्मचारी, ८०० होमगार्डस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त असणार आहे.