कोपरगाव : शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून धाडसी घरफोड्या करून चो-या करणा-या इंदोर (मध्यप्रदेश) मधील अट्टल गुन्हेगारास शहर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून मारूती सुझुकी कंपनीच्या के-१० कारसह ८-९ लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.एका चोरीच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी संशयीत आरोपी पवन रामदास आर्य (वय ३१), रा. रामकृष्ण बाग कॉलनी पो. खजराना, जि. इंदोर यास अडीच लाख रूपये किमतीच्या पांढ-या रंगाच्या के-१० कार(क्रमांक एम.एच.१७, अे.झेड. ९५५४) सह अटक केली. कारच्या नोंदणीवरून तेथील पोलिसांनी कोपरगाव पोलीस ठाण्यास कळविले. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार व उपाधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी आरोपी आर्य यास नागपूर पोलिसांकडून स्थलांतर वॉरंटव्दारे अटक करून कोपरगावला आणले. अधिक चौकशी केल्यावर आरोपीने आपण मित्रासोबत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनास आलो होतो. मात्र जाताना मित्राने आपल्याला साईनगरच्या फादरवाडी जवळ राहणारे एस.जी. विद्यालयाचे लिपीक राजकुमार काले यांच्या घरी घरफोडी करण्यास भाग पाडले. काले यांच्या घरातून १४ तोळे सोने, अर्धा किलो चांदीचे भांडे, अडीच लाखांची रोकड, २ टायटनची घड्याळे चोरली. तसेच २ डिसेंबर रोजी शहरातील शुभम नगरमधील अनंत चौधरी यांचे घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज बाहेर उभ्या असलेल्या के-१० कारसह चोरून नेल्याची कबुली आरोपीने दिल्याचे जाधव यांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी ९० दिवसात तपास करून के-१० कारसह ८-९ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.बी. भालेराव, कॉन्स्टेबल संभाजी शिंदे, अशिष मैंद हे करीत आहेत.
कोपरगाव परिसरात घरफोड्या करणारे परप्रांतीय गुन्हेगार नागपुरात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 7:47 PM