ग्रामदैवतांच्या यात्रेचे पैसे कोरोना उपचारासाठी द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:28+5:302021-05-20T04:21:28+5:30
श्रीरामपूर : महाराष्ट्रामध्ये शहर व ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या यात्रा फेब्रुवारी ते मे अखेर भरविण्यात येतात. दोन वर्षे झाली, कोरोना ...
श्रीरामपूर : महाराष्ट्रामध्ये शहर व ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या यात्रा फेब्रुवारी ते मे अखेर भरविण्यात येतात. दोन वर्षे झाली, कोरोना लॉकडाऊनमुळे देवस्थानांच्या विश्वस्तांना शासनाने यात्रा न भरविण्याचे आदेश दिले. त्यामुळे यात्रेची सालाबादप्रमाणे वर्गणी झाली नाही.
गावातील यात्रा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत यात्रेच्या नावाने दरडोई कमीतकमी १०० रुपये वर्णगी जमा करून प्रत्येक तालुक्याच्या शासकीय रुग्णालयास ग्रामदैवताच्या नावाने मदत म्हणून द्यावी. त्यातून ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, इंजेक्शन, औषधे व रुग्णालयास उपयुक्त साहित्यखरेदी करता येतील. वस्तू दिल्या तर त्या गावाचे नाव होईल. आपत्तीजनक परिस्थितीत मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचे समाधान प्राप्त होईल.
समाजातील बराच वर्ग पैसे नसल्यामुळे आपले प्राण गमावत आहे. यात्रेनिमित्त दरडोई मदत म्हणून १०० रुपये वर्गणी जमवून राष्ट्रकार्य समजून प्रत्येक गावाने पुढाकार घेणे काळाची गरज आहे.
एका गावाने पुढाकाराने सुरुवात केली, तर त्या गावाचे अनुकरण सर्वत्र होऊन जमलेल्या पैशांतून सरकारी रुग्णालयातील कोरोना रुग्णांना त्यांची निश्चितच मदत होईल. याचा विचार ग्रामस्थांनी करून गावपातळीवर काम करावे तसेच अनेक यात्रा ट्रस्टकडे वर्गणीचे लाखो रुपये जमा आहेत. जमा रकमेतून मुख्यमंत्री निधीस काही रक्कम देऊन शासनासही मदत करावी, हीच अपेक्षा कोरोना प्रतिबंधात्मक मदतीच्या निमित्ताने नागरिकांकडून होत आहे.
----------