शिर्डी शहरात वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वसुली सुरू आहे़ वीज बिल न भरल्यास जोड कट करण्यात येत आहे़ यासंदर्भात सचिन चौगुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मदन मोकाटे, समीर शेख आदींनी वीज जोड कट करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली़
शहरात कोरोनाने अनेक कुटुंबे बाधित झाली होती. साईबाबांचे मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय, हार-फुले विक्री करणारे, दुकानदार तसेच साईभक्तांवर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसाय, साईभक्तांना ने-आण करणारा वाहन व्यवसाय (टुरिस्ट) पूर्णपणे बंद आहे. शिर्डीत जवळजवळ अघोषित लॉकडाऊनच आहे. त्यामुळे शिर्डीतील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून या कठीण काळात वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वसुली सुरू आहे. बिल न भरल्यास वीज कनेक्शन कट केले जात आहे.
मंदिर सुरू झाल्यानंतर शिर्डीकर पूर्णपणे वीज बिल भरतील; परंतु आज रोजी सुरू असलेली कारवाई शिथिल करण्यात यावी, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना वीज वितरणने कनेक्शन कट करून अंधाराच्या खाईत लोटू नये, अशी मागणी अहमदनगरचे वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सांगळे, उपकार्यकारी अभियंता पाटील, शिर्डी येथील जगताप यांना केली आहे़