नगरमध्ये काळाबाजार रोखण्यासाठी 'रेमडिसीवीर' विक्रीची होणार पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 PM2021-04-09T16:25:56+5:302021-04-09T16:27:32+5:30
उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने सध्या रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मात्र उपलब्ध इंजेक्शनचे योग्य वितरण व्हावे तसेच काळाबाजार होऊ नये, यासाठी तपासणी पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अहमदनगर: उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने सध्या रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मात्र उपलब्ध इंजेक्शनचे योग्य वितरण व्हावे तसेच काळाबाजार होऊ नये, यासाठी तपासणी पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अशोक राठोड यांनी सांगितले.
कोरोना उपचार केंद्राला सलग्न असलेल्या मेडिकलमध्येच सध्या रेमडिसीवीर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील अशा 45 मेडिकलची यादी अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केली आहे. शहरासह जिल्ह्यात मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून रेमडिसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडिसीवीर घेऊन या, असे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांना सांगत आहेत. नातेवाईकांना मात्र हे इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही. पर्यायाने जास्त पैसे मोजून हे इंजेक्शन खरेदी करण्याची वेळ अनेकांवर ओढवली आहे. रेमडिसीवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विशेष पथकाची स्थापना करून इंजेक्शन विक्रीची पडताळणी करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
बाराशे इंजेक्शन उपलब्ध होणार
नगर जिल्ह्यात दररोज गरजेइतके इंजेक्शन उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी जिल्ह्यासाठी बाराशे इंजेक्शन मिळणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
एमआरपी पेक्षा जास्त किंमत मोजावी लागते
सात वेगवेगळ्या कंपन्यांचे रेमडीसीवीर इंजेक्शन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक कंपनीची किंमत वेगवेगळी आहे. इंजेक्शनवरील छापील एमआरपी कमी कराव्यात अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कंपन्यांना केली आहे. नगरमध्ये मात्र एमआरपीच्या तीन ते चार पट पैसे मोजून हे इंजेक्शन खरेदी करावी लागत असल्याची सध्याची परिस्थिती आहे.
'ते' नंबर स्विच ऑफ
रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील 45 मेडिकलची यादी त्यांच्या मोबाईल क्रमांकासह अन्न, औषध प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे. प्रत्यक्षात मात्र यातील बहुतांशी फोन स्विच ऑफ आहेत तर जे फोन घेतात ते इन्जेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत, अशी माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.