पुणतांबा ग्रामीण रुग्णालय : अधिका-यांविना चालतो रुग्णालयाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:55 PM2019-07-07T13:55:27+5:302019-07-07T13:58:23+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक हे पद सहा वर्षापासून रिक्तच आहे. तर वैद्यकीय अधिकारी डॉ.थोरात यांची ६ जूनला पुणतांबा बदली झाल्याने ते पद रिक्त आहे
मधु ओझा
पुणतांबा : येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक हे पद सहा वर्षापासून रिक्तच आहे. तर वैद्यकीय अधिकारी डॉ.थोरात यांची ६ जूनला पुणतांबा बदली झाल्याने ते पद रिक्त आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा कारभार रामभरोसे आहे.
पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिक्षक एक पद, वैद्यकीय अधिकारी तीन पदे, अधिपरिचारिका एक पद, क्ष-किरण तंत्रज्ञ एक पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पद, कक्ष सेवक एक पद, सफाई कर्मचारी दोन पदे, औषध निर्माण अधिकारी एक पद व सर्व कर्मचारी वर्ग व त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षक येथे नाही. रुग्णालयात येणाºया रुग्णाला तातडीची सेवा मिळत नाही. कारण निर्णय घेणारे वैद्यकीय अधीक्षक हे पद सहा वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजेचे दाखले, शव विच्छेदन, बाळंतपणातील गुंतागुंतीच्या केसेस कर्मचाºयांना अडचणीच्या ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्प दंशाच्या रुग्णांना प्रथमोपचार देता येत नाही. कारण जबाबदारी घेणारे अधिकारी नाहीत. रात्री, अपरात्री तातडीचे उपचार रुग्णाला मिळत नाहीत. पुणतांबा ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षेत श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव, मातुलठाण, नाऊर, नायगाव तर राहाता तालुक्यातील जळगाव, रामपूरवाडी, नपावाडी, शिंगवे, पुणतांबा ही गावे येतात. तर वैजापूर तालुक्यातील लाखगंगा, बाबतरा, पुरणगाव, डोणगाव ह्या गावातील रुग्ण रोज असतात. सध्या प्रत्येक वारासाठी वेगळे वैद्यकीय अधिकारी असल्याने फेरतपासणीच्या रुग्णांना अडचणी येत आहे.
या सर्व प्रश्नांचा खुलासा करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
मी स्वत: एका शेतमजुराच्या मुलीला सर्पदंश झाला म्हणून पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात गेलो. उपचार देण्यासाठी कुणीच नसल्याने मुलीला अहमदनगरला घेऊन जायला निघालो. पण दुर्दैवाने त्या चिमुकलीने रस्त्यातच अखेरचा श्वास घेतल्याची घटना आयुष्यभर न विसरणारी आहे. - प्रभाकर धनवटे, नागरिक, पुणतांबा.
वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी ही पदे उपसंचालकांकडून भरली जातात. त्याचा आम्ही पाठपुरावा करीत आहोत. -डॉ.गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रभारी, अहमदनगर.