शरद शिंदे ।
आढळगाव : श्रीगोंदा-चांडगाव रस्त्यावर शेती असणा-या संपत किसन कोथिंबीरे यांच्या जांभळाची पुणेकरांना गोडी लागली आहे. जांभळाला प्रति किलो अडीचशे रूपयांचा भाव मिळत आहे. यासाठी अगाऊ मागणी होत असून आॅनलाईन पेमेंट मिळाल्यानंतर जांभूळ पोहोच केले जात आहे. कोरोना काळात शेतकरी हतबल झालेले असतानाच कोथिंबीरे यांच्या जांभळाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
संपत कोथिंबीरे यांना साडेनऊ एकर शेती आहे. त्यामध्ये पाच एकर द्राक्षे, तीन एकर डाळिंब आहे. जेमतेम शिक्षण असलेले कोथिंबीरे शेतीच्या अभ्यासासाठी राज्यभर फिरले आहेत. त्या अभ्यासातून त्यांनी जांभूळाचे व्यावसायिक महत्व ओळखले. केवळ सव्वा एकर क्षेत्रात चार वर्षापूर्वी बहाडोली वानाचे जांभूळ लावले. सोळा बाय सोळा फूट अंतरावर लागवड केली. त्यात अडीचशे झाडे बसली. शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला. औषधी गुणधर्माबरोबरच उत्तम सौंदर्य प्रसाधक असलेल्या आंबट, गोड आणि तुरट चव असणाºया रसाळ जांभूळाला मोठी मागणी असते. गेल्या वर्षी फळांना सुरुवात झाली. यावर्षी कोथिंबीरे परिवाराने जांभळाच्या शेतीला विशेष लक्ष देऊन जोमदार फळ आणले.
कोथिंबीरे यांच्या पत्नी नंदा दिवसभर स्थानिक मजुरांच्या मदतीने निगुतीने झाडावरून फळे काढून घेतात. शाळांना लॉकडाऊन असल्यामुळे घरीच असलेली मुले सोनाली, वैष्णवी आणि ओम हे फळांची प्रतवारी करून प्रत्येक फळ पाहून बॉक्समध्ये भरतात. मागणीनुसार बॉक्स भरून सकाळीच्या वेळी लवकरच स्वत: संपत कोथिंबिरे पुण्याला रवाना होतात. यातून त्यांना दहा लाखाच्या उत्पन्नाची आशा आहे. तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कृषी सहाय्यक अजिनाथ फंड यांनी भेट देऊन जांभूळ शेतीचे कौतुक केले.
शेतक-यानेच ठरविला भावकोरोनाच्या संकटामुळे शहरांतील फळविक्रीची साखळी ब्रेक झाली होती. कोथिंबीरे यांचा कष्टाने मिळविलेल्या आपल्या उत्पादनावर विश्वास असल्यामुळे पुण्याची बाजारपेठ काबीज करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाला न घाबरता आरोग्याची काळजी घेऊन पुणे परिसरातील रहिवासी सोसायट्यांमध्ये एक किलोच्या आकर्षक पॅकिंगच्या ‘कोथिंबीरे फार्म’च्या ब्रँडने जांभूळ विक्री सुरू केली. दर्जेदार जांभळामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. पुण्याच्या बाजारपेठेत व्यापा-यांच्या नाही तर कोथिंबीरेंच्या मतावर जांभळाचा बाजार ठरला.