‘रखूमाई’ ठरतेय कर्तृत्ववान महिलांचा आयकॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:20+5:302021-03-08T04:21:20+5:30
केडगाव : नगरची पहिली महिला रिक्षाचालक नीलिमा खरारे यांचा प्रेरणादायी प्रवास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उलगडला जात आहे. एका ...
केडगाव : नगरची पहिली महिला रिक्षाचालक नीलिमा खरारे यांचा प्रेरणादायी प्रवास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उलगडला जात आहे. एका सामान्य कुटुंबातील अशिक्षित महिलेची ही धडपड समाजातील सर्व कर्तृत्ववान महिलांसाठी प्रेरक ठरणार आहे.
दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने या महिलेची कहाणी समाजासमोर मांडली होती. आज पुन्हा कृष्णा बेलगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या माहितीपटातून हा प्रवास समोर येत आहे.
एका बाजूला स्त्री सबलीकरणासाठी अट्टाहास धरणारा आपला समाज दुसऱ्या बाजूला तिला दुय्यम वागणूक देताना पाहावयास मिळतो; परंतु तिचं आकाश निवडण्याचं स्वातंत्र्य तिला आहे, हे आपण सर्वजण विसरूनच जातो. अशा परिस्थितीत स्वत:च्या सबलीकरणासाठी एखादी अशिक्षित महिला काय करू शकते? खरं तर हा प्रश्नच जटील वाटतो; परंतु तरीही कोणाची मदत न घेता, कुठलीच अपेक्षा न ठेवता समोर आलेल्या परिस्थितीशी हीच स्त्री दोन हात करते आणि परिस्थितीला हरवून विजयश्री पदरात पाडून घेते.
‘रखूमाई’ हे याच स्त्रीचं प्रातिनिधिक उदाहरण होय. रखूमाई म्हणजे संसाराची चाकरी स्वत:च्या हातात घेऊन आपल्या विठोबाला सोबत करणारी प्रत्येक घरातली स्री. आज नीलिमाताईंच्या निमित्ताने तिचा प्रवास जगाला पाहावयास मिळणार आहे.
अहमदनगरच्या ‘रंगभूमी एंटरटेन्मेंट'’ या संस्थेने बनवलेला हा माहितीपट समाजातील सर्व क्षेत्रातील महिलांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरू शकेल. कृष्णा बेलगावकर यांनी लेखन, दिग्दर्शन केलेल्या या कथेचं चित्रीकरण भूषण गणूरकर यांनी केलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ‘रंगभूमी एंटरटेन्मेंट’च्या युट्यूब चॅनेलवर माहितीपट प्रदर्शित झाला आहे.
---
महिला सक्षमीकरणाच्या गप्पा फक्त भाषणातून होतात. बहुतांशी महिलांचे वास्तविक जीवन दुर्लक्षित आहे. अशा परिस्थितीत महिलांना कोणीतरी प्रेरणादायी ठरावी अशी कर्तृत्ववान महिला या माध्यमातून आम्ही समोर आणली आहे. निश्चितच हा प्रवास महिलांना आवडेल.
-कृष्णा बेलगावकर,
दिग्दर्शक, रखूमाई
---
‘लोकमत’मधून दोन वर्षांपूर्वी माझ्या जीवनाचा संघर्षमय प्रवास प्रसिद्ध झाला. एक महिला रिक्षाचालक म्हणून समाजाला अप्रुप वाटले; पण ती माझ्या जगण्याची गरज होती. तोच प्रवास रखूमाईमधून समोर येत आहे. याचा निश्चितच आनंद व अभिमान आहे.
-नीलिमा खरारे,
महिला रिक्षाचालक
--
०७ रखूमाई