शिर्डी : साईबाबांवरील श्रद्धेपोटी वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडूनही मनासारखे साईदर्शन मिळत नसल्याची खंत वर्षानुवर्षे मनी बाळगणाऱ्या सामान्य भाविकाला ‘लोकमत’च्या ‘भक्तांची दर्शनबारी’ या लेखमालेने आशेचा किरण दाखवला आहे़या लेखमालेबद्दल ग्रामस्थांबरोबरच अनेक भाविकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद देत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाविकांनी संस्थान व्यवस्थापन व प्रशासन भाविकांच्या आनंददायी दर्शनासाठी सकारात्मक भूमिका घेईल, असा आशावादही व्यक्त केला़ या लेखमालेवर सोशल मीडियातूनही नेटिझन्सनी सहमतीची मोहर उमटवली़ भाविकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली, यावरही अनेक भाविकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाविकांनी दर्शन सुलभ होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे़‘‘प्रत्येक जण आत्मिक समाधानासाठी देवदरबारी जातो़ दर्शनासाठी कितीही त्रास सहन करण्याची भक्तांची तयारी असते़ आत्मिक समाधान देणाºया दर्शनाने त्यांचा थकवा क्षणार्धात नाहीसा होतो. नेमकी हीच गोष्ट ‘लोकमत’च्या दोन दिवसांच्या वृत्तमालिकेत अधोरेखित झाली़ भक्तांच्या गर्दी नियोजनासाठी मंदिरात काच लावणे, शिर्डीत गर्दी होण्यापूर्वीच साईभक्तांची वाहने गावाबाहेर अडवणे या गोष्टी म्हणजे दुखण्यापेक्षा इलाज भयंकर अशा आहेत. यातून कळत, नकळतपणे ‘तुम्ही आम्हाला नको आहात’ असा संदेश जाऊ शकतो म्हणून संबंधितांनी वृत्तमालिकेकडे टीका म्हणून न बघता या साईभक्तांच्या भावना आहेत या दृष्टीने बघावे.’’ -संतोष खेडलेकर, शिर्डी.‘‘साईसंस्थान व्हीआयपी भाविकांना सन्मान देते. दर्शनाची सोय करते. त्याचप्रमाणे भेदभाव न करता श्रद्धेने आलेल्या गरीब भाविकालाही तेवढाच सन्मान द्यायला हवा़ संस्थानने नोंदवही ठेवून भाविकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर व्यवस्थापनाला उणीवा लक्षात येतील़ शेगावातील सेवाभाव वाखाणण्याजोगा आहे. या उलट शिर्डीत अरेरावीची भाषा, दादागिरी, मारहाण असेच प्रसंग नेहमी पहावयास मिळतात़ संस्थानने देणगी व धन कमावले तशी आपुलकी व माणूसकीही कमवायला हवी़ ‘लोकमत’ने आमच्या भावनांना वाट करून दिली़’’ -कमलाकर जोशी,साईभक्त, नांदेड.
‘भक्तांच्या दर्शनबारी’ने सामान्य भाविकांना आशेचा किरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:28 PM