टाकळी ढोकेश्वर : रयत शिक्षण संस्थेच्या जलयुक्त शिवार योजनेतून धोत्रे बुद्रुक व खुर्द (ता. पारनेर) येथील २२ बंधाऱ्यांमध्ये तब्बल १३ कोटी लीटर पाणीसाठा झाला आहे. या पाण्यामुळे दुष्काळी धोत्रे गावामध्ये तब्बल दोनशे एकर क्षेत्राला रब्बी हंगामात पाणी उपलब्ध झाले आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष दादा कळमकर, उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण कडू यांच्या प्रेरणेने दुष्काळी भाग व रयत शिक्षण संस्थेची शाखा असलेल्या गावांमध्ये मे महिन्यात हा प्रकल्प राबविण्यात आला. संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार स्वेच्छेने यासाठी दिला. धोत्रे येथे नदीपात्र, ओढ्यावर असलेल्या शासनाच्या ‘केटिवेअर’च्या साठवण क्षेत्रातील नदी पात्राचे खोलीकरण केले़ मे महिन्यात तब्बल २१ दिवस २ जेसीबी व २ पोकलेननरे हे खोलीकरण केले़ यासाठी अंदाजे ५ लाख रुपये खर्च आला. यासाठी मुख्याध्यापक अशोक जाधव, भाऊसाहेब झावरे, बाळासाहेब भांड व सेवकांचे योगदान लाभले. विभागीय अधिकारी शिरसाठ, सहविभागीय अधिकारी एस. पी. ठुबे, अभियंता नलगे यांनी यासाठी विशेष लक्ष दिले.बंधाऱ्यातील पाण्यामुळे ग्रामस्थांचे चेहरे खुलले असून, पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन बुधवारी ‘रयत’चे उपाध्यक्ष दादा कळमकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सरपंच बाबासाहेब सासवडे, उपसरपंच अरुणा साळवे, वाय. बी. शिरसाठ, एस. पी. ठुबे, महेश पाटील, पांडुरंग भांड, रामाजी भांड, जालिंदर भांड, मुख्याध्यापक अशोक जाधव, भाऊसाहेब झावरे, बाळासाहेब भांड, सेवक हजर होते.
‘रयत’ने साठविले तेरा कोटी लिटर पाणी
By admin | Published: October 07, 2016 12:30 AM