लोकमत न्यूज नेटवर्कबोटा : कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा जुन्नर व पारनेर तालुक्यातील शेतीला फायदा होणार आहे.पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचा शेवट पारनेर तालुक्यातील वडझिरे तलावात होतो. ७१ किलोमीटर लांबीचा असणारा हा कालवा पारनेर तालुक्यात २५ किलोमीटर लांबीचा आहे. पारनेर तालुक्यातील जिरायती भागाला हा कालवा वरदान ठरला आहे.या धरणाच्या कालव्याचे आवर्तन गुरूवारी सायंकाळी सोडण्यात आले असल्याचे कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर व उपविभागीय अभियंता मिलींद बागुल यांनी सांगितले. सोमवारी हे पाणी वडझिरे तलावात पोहचणार आहे. या आवर्तनामुळे पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार असून पारनेर तालुक्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्रफळावर रब्बी पिकांना फायदा होणार आहे.