कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईदर्शनाचा कालावधी घटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:04+5:302021-02-24T04:23:04+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साई संस्थानने विविध निर्णय घेतले आहेत. संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साई संस्थानने विविध निर्णय घेतले आहेत. संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे आदींची उपस्थिती होती.
शिर्डीतील देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या बघता प्रशासनाच्या दृष्टीने साई मंदिर संवेदनशील आहे. त्या अनुषंगाने भाविक व ग्रामस्थांच्या रात्रीच्या वावरावर निर्बंध आणण्यासाठी रात्री साडेदहा वाजता व पहाटे साडेचार वाजता होणाऱ्या काकड आरती भाविकांविना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पूर्वी साईची आरती व स्नानानंतर पावणेसहा वाजता सुरू होणारे दर्शन सकाळी सहा वाजता सुरू होईल. रात्री साडेदहाच्या आरतीपर्यंत सुरु असणारे दर्शन रात्री नऊ वाजताच बंद करण्यात येईल. यामुळे दर्शनाची वेळ दीड ते पावणे दोन तासांनी कमी होईल. गेल्या दोन आठवड्यापासून सुरू करण्यात आलेली गुरूवारची पालखी सुद्धा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
.................
बायोमेट्रिक पास कांऊटर बंद
गुरूवार, शनिवार, रविवार व गर्दीचे दिवशी शिर्डीत बायोमेट्रिक पास काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी भाविकांना केवळ आगावू ऑनलाईन दर्शन पासेस काढूनच साई दर्शनाला यावे लागणार आहे. पूर्वी प्रमाणेच मास्क सक्ती व कोविड नियमांसह गर्दीच्या वारानुसार रोज दर्शन रांगेतील दीडशे ते दोनशे भाविकांची कोविड तपासणी करण्यात येणार असल्याचेही सीईओ कान्हुराज बगाटे यांनी स्पष्ट केले आहे. साईसंस्थानच्या निर्णयामुळे आम्हीही शिर्डीत रात्रीच्या संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू करत आहोत असे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी सांगितले.