'त्या' कंत्राटदाराचा ठेका काढून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:17+5:302021-02-24T04:22:17+5:30
शेवगाव : येथील शासकीय धान्य गोदामात अफरातफर व काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असून, गोदामातील वाहतूक कंत्राटदार हा हमाल आहे. ...
शेवगाव : येथील शासकीय धान्य गोदामात अफरातफर व काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असून, गोदामातील वाहतूक कंत्राटदार हा हमाल आहे. त्यास बडतर्फ करून त्याच्याकडील कंत्राट काढून घ्यावे, अन्यथा पाथर्डी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दिला आहे.
याबाबत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविले आहे. यात म्हटले आहे की, कंत्राटदार प्रदीप नानासाहेब काळे व योगेश नानासाहेब काळे हे हमाल असून, त्यांच्या स्वतः मालकीचा ट्रक व टेम्पो असून, ते वाहतूक कंत्राटदार आहेत. शासकीय गोदामातील प्रत्येक धान्याच्या कट्ट्यातून एक ते दीड किलो धान्य काढून ते काळ्या बाजारात घेऊन जात असताना नागरिकांनी ( दि.८ फेब्रुवारी) रोजी तालुक्यातील अमरापूर येथे सदर टेम्पो पकडला आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये जीवनावश्यक कायदा,कलम १९५५ नुसार ३/७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आरोपी प्रदीप काळे हा अद्याप फरार असून, त्याला जामीन मिळालेला नाही. त्याने शेवगाव, राहुरी, पारनेर या ठिकाणी वाहतूक कंत्राट घेतलेले असून, त्याच्या माध्यमातून धान्याचा काळाबाजार करीत आहे.
प्रदीप काळे व योगेश काळे यांच्याकडे त्यांच्या मालकीची १५ वाहने असून, भ्रष्टाचाराने मोठी संपत्ती त्यांनी कमावली आहे. त्यांच्याकडील कंत्राट काढून घ्यावे, अन्यथा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा प्रहारने दिला आहे.
निवेदनावर प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे यांची स्वाक्षरी आहे. सदर निवेदनाच्या प्रती अन्न पुरवठा मंत्री, विभागीय आयुक्त, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.