अहमदनगर : आर्थिक स्थिती बिकट असली तरी, महापालिकेचा खर्च कमी झालेला नाही. विभागप्रमुखांकडूनही तसा प्रयत्न होताना दिसत नाही. परंतु, मानधनावर घेतलेल्या विद्युत अभियंत्यांनी तीन वर्षात महापालिकेची सहा कोटींची बचत केली आहे. बचतीची रक्कम थकीत बिलातून वजा करण्यात आली आहे. त्यामुळे मनपाच्या वीज बिलातून ही रक्कम कमी केली आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसह, पाणीपुरवठा योजना, पथदिवे, विद्युत मोटारी यासाठी मोठ्या प्रमाणात वीज वापर होतो. महिन्याला महापालिकेत ४५ लाख रुपये बिल आकारले जात होते. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने वेळेवर वीज बिल भरले जात नाही. त्यामुळे कोट्यवधींचे बिल थकीत आहे. वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्याच्याही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परंतु, महावितरण आकारत असलेले वीज दर योग्य आहेत किंवा नाही, याची उलटतपासणी मनपाकडून कधीही केली गेली नाही. मनपाने महावितरणमधून सेवानिवृत्त झालेल्या दोन अभियंत्यांना मानधनावर घेतले. त्यांनी शहरात फिरून बिलनिहाय मीटरची प्रत्यक्ष पाहणी केली. महावितरण जे बिल आकारते, ते मीटर प्रत्यक्षात आहे किंवा नाही याची खात्री केली. यामध्ये १३ मीटर अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. तरीही महावितरणकडून बिल आकारले जात होते. ही बाब विद्युत अभियंत्यांनी महावितरणच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे महावितरणलाही बिले कमी करणे भाग पडले.
सन २०१७ पासून हे अभियंते प्रत्येक मीटरच्या वीज वापराच्या नोंदी घेत असून, त्यातील तफावत शोधून काढत आहेत. त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र नोंदवहीच केली आहे. यापूर्वी असे टिपण महापालिकेकडेही उपलब्ध नव्हते. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही, एवढे बिल कसे येते, याचा अभ्यास करण्याची तसदी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे मोघमपणे बिल आकारले जात होते. त्याचा भुर्दंड महापालिकेला सोसावा लागत होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसंत टेकडी येथील विद्युत मोटारींसाठी सन २०१८ पासून वाणिज्य या संकेत दराने वीज बिल आकारणी होत होती. ती आता सार्वजनिक पाणीपुरवठा संकेत दराने हाेत आहे. त्यामुळे महापालिकेची ३८ लाख ७४ हजार ८२० रुपये इतकी बचत झाली आहे. ही रक्कम महापालिकेच्या थकीत बिलातून कमी केली जाणार आहे. अन्य बिलांमध्ये अशी कपात करण्यात आली असून, महापालिकेची एकूण ६ कोटींची बचत झाली असल्याचे सांगण्यात आले.
....
मनपा भरत होती ग्रामपंचायतीचे वीज बिल
शेजारच्या नवनागापूर, बुऱ्हाणनगर आणि बुरुडगाव ग्रामपंचायतीचे वीज बिल महापालिका भरत होती. ग्रामपंचायती वापरत असलेल्या विजेचे बिल महापालिका भरत असल्याची बाब अभित्यांनीच उघडकीस आणली.