श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळे कमी कालावधीत सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले असून फळबागांना संजीवनी मिळाली आहे.
कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन येडगाव धरणातून ४० दिवसांचे आवर्तन देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समिती बैठकीत झाला होता. सल्लागार समितीच्या निर्णयानुसार कुकडी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी देणे अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान होते. परंतु, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांत ‘माझा कालवा माझी जबाबदारी’ या अभियानातून कालव्यातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता २०० क्युसेकने वाढली. त्यामुळे कुकडीचे पाणी २४९ किलोमीटर म्हणजे करमाळा तालुक्यात गेले. पहिले सात दिवस करमाळ्यास पाणी देण्यात आले. अकरा दिवस कर्जत तालुक्यास पाणी देण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यास नऊ ते दहा दिवस पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार, सध्या श्रीगोंदा तालुक्यात आर्वतन सुरू आहे.
डीवाय बाराच्या टेलच्या शेतकऱ्यांना ११ वर्षांनंतर प्रथमच पाणी मिळाले. १३२ जोडकालव्यांखालील शेतकऱ्यांची भरणी राहू नये, यासाठी विसापूर कालव्यातून काही पाणी सोडले गेले. हे आवर्तन अंतिम टप्प्यात आले. टेल असूनही पाणी मिळाल्याने फळबागांना संजीवनी मिळाली आहे.
---
आणखी आवर्तन पाहिजे
कुकडीमधून सोडलेले आवर्तन सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहे. ही जमेची बाजू असली तरी मे महिन्यात कुकडीचे पाणी पिण्यासाठी आवर्तन सोडून सर्व २० तलाव भरणे आवश्यक आहे. तरच, कुकडी लाभक्षेत्रातील तहान भागेल व फळबागा जगण्यास मदत होईल. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.
---
कुकडीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला चोरीच्यावाडीला पाणी नेले. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल की नाही, याबाबत शंका होती. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पाणी मिळाले.
- बाळासाहेब खेतमाळीस, अध्यक्ष, सावता माळी सहकारी पाणीवापर संस्था
---
या आवर्तनाचे नियोजन चांगले झाले आहे. हे नाकारता येणार नाही. मात्र, मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी तलावात पाणी सोडणे आवश्यक आहे. तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. अन्यथा, परिस्थिती अवघड होईल.
-शिवप्रसाद उबाळे,
सरपंच, आढळगाव
--
०७ कुकडी
श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्यातून सुरू असलेले आवर्तन.