लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी : सततचा लॉकडाऊन व कडक निर्बंधांमुळे शेतात मजूर कामाला येत नाहीत. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही. बाजारात तो नेलाच, तर पोलीस विकण्यासाठी बसू देतील की नाही आणि बसू दिले तर तो विकला जाईल, याची कोणतीही हमी नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सडण्यासाठी सोडून द्यावा लागत आहे.
३१ मे पर्यंत बाजार समित्या बंद ठेवण्याच्या निर्णयाने शेती आणि शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. पिकलेला माल शेतात कुजविण्यासाठी जिवाचे रान केले का, हा एकच प्रश्न शेतकऱ्यांच्या काळजाला आता वेदना देत आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करतो. मागील खरिपात झालेला अतिपाऊस व त्यामुळे मका, सोयाबीन, कपाशी, डाळिंब, कांदा यासारख्या पिकांवर आलेले रोग, घटलेले उत्पादन, पडलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला फार काही लागले नाही.
कमी कालावधीचे पीक घेऊन दोन पैसे हातात येतील या एकाच आशेवर कर्जबाजारी होऊन गहू, कांदे, टोमॅटो, टरबूज, खरबूज, काकडी, कोथिंबीर, भाजीपाला अशी पिके लावली. मात्र, गहू व कांदा सोडला तर बाकी पिके ही रोजच्या रोज काढून बाजारात विक्रीसाठी न्यावी लागतात. अन्यथा ती खराब होतात; पण लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे पोलीस रस्त्यावर बसू देईना आणि बसू दिले तर गिऱ्हाईक मोकळ्या मनाने येईनात, अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहे.
साधारणपणे मार्चपासून टरबूज बाजारात येतात. मात्र, ऐन टरबूज काढण्याच्या वेळीच शासनाकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे व्यापारी माल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हा माल शेतातच सडून गेला. शेतकऱ्यांना आपला माल विक्रीअभावी फेकून द्यावा लागला. ओलीत व ठिंबक सिंचनाद्वारे राहाता तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाबरोबर फळभाज्यांची लागवड केली. मात्र, आधी ९ महिन्यांपासून गावोगावचे बंद असलेले आठवडी बाजार आणि आता बाजार समित्या बंद यामुळे शेती मोडून पडली आहे.
..................
फळभाज्या बेभाव.....
संचारबंदीमुळे फळ, भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काकडी, टोमॅटो, वांगी भाजीपाला याही पिकांची दैनावस्था आहे. लग्नाचा सीझन डोळ्यासमोर ठेवून मोठ्या आशेने लावलेली फुलविलेली ही पिके सोडून देताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे पीक शेतात तयार आहे; पण बाजारात पाहिजे तसा भाव नाही. ग्राहक नाही ही मोठी शोकांतिका आहे.
..................
गव्हाला नाही भाव
एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी गव्हाची सोंगणी केली; पण वाहतूक सेवा बंद असल्याने यंदा इतरत्र नेण्यास लॉकडाऊनमुळे अडचणी येत आहेत. परिणामी गव्हाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लॉकडाऊनचे संकट डोक्यावर असताना अवकाळी पावसाने अधिकच चिंतेत भर टाकली. ज्या गव्हाला किमान दोन हजार ते २२०० रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता, तिथे आजघडीला १५०० रुपये प्रतिक्विंटल मागितला जात आहे.
................
संकटातही काढला मार्ग
लॉकडाऊननंतर शेतातला माल विकण्यासाठी काही शेतकरी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहत नाहीत ते स्वत: भाजीपाला आणि फळं विकत आहेत. एक दिवस मी धडा केला. टू व्हीलरवर एक कॅरेट खरबूज ठेवले आणि शेजारच्या गावात विकायला गेलो. माल कुणी घेईल की नाही याची मनात धाकधूक होती; पण तासाभरातच सगळे खरबूज विकले. दुसऱ्या दिवसापासून मग मी ट्रॅक्टर भरून खरबूज घेऊन जायला सुरुवात केली. सकाळी ८ ते १२ च्या दरम्यान सगळी विकून यायचो. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातलं अंतर कमी झालं की नफा चांगला मिळतो. अवघ्या तीस गुंठ्यातील खरबुजांमधून तब्बल सव्वालाख रुपयांहून अधिक कमाई केली.
-मनोज अरुण घोगरे, लोणी खुर्द.