धामणगाव पाट ते मोग्रस रस्त्याचे अस्तित्व संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:27+5:302020-12-23T04:17:27+5:30
अकोले तालुक्यातील दक्षिण भागातील कोतूळ, कोहणे, ब्राह्मणवाडा, सातेवाडी या चारही मंडळांतील चाळीस गावांना संगमनेर येथील महामार्गावर जोडणारा कोतूळ- धामणगावपाट- ...
अकोले तालुक्यातील दक्षिण भागातील कोतूळ, कोहणे, ब्राह्मणवाडा, सातेवाडी या चारही मंडळांतील चाळीस गावांना संगमनेर येथील महामार्गावर जोडणारा कोतूळ- धामणगावपाट- मोग्रस पिंपळगाव खांड या रस्त्यावर धामणगाव पाट ते मोग्रस (मूळमाता मंदिर) ते गाव या दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन ते साडेतीन फूट खोलीच्या घळ्या पडल्याने व केवळ चार पाच फुटांचा डांबर पट्टा शिल्लक राहल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर दिवसा वाहने लाइट लावून चालतात. रस्त्याच्या दुतर्फा वेड्या बाभळी वाढल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर एसटी व रुग्णवाहिका बंद झाल्या आहेत. संगमनेर येथे जाण्यासाठी मोग्रस हा मार्ग सध्या नजीकचा आहे. मोग्रस -धामणगाव पाट या रस्त्यांची दुरवस्था झाली. मात्र, मोग्रस ते पांगरी पिंपळगाव खांड हा मुख्यमंत्री ग्राम सडकचा तीन वर्षांपूर्वी झालेला रस्ता शहरातील रस्त्यांप्रमाणे चकाचक आहे. केवळ दोन किलोमीटर खराब रस्ता सध्या नागरिकांना धोकादायक ठरत आहे.
..........
गेल्या तीन वर्षांपासून मोग्रस रस्ता अत्यंत खराब आहे. यंदा तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. एसटी चालकांनी या रस्त्यावर एसटी न चालवण्याबाबत आगारप्रमुखांना कळवले आहे. दोन ठिकाणी ओढ्यावरचे पूलही खचले आहेत.
- बाळासाहेब चांगदेव गोडे, चालक, अकोले आगार.