नेवासा : रस्त्याच्या कामात मला गुणवत्ता हवी आहे. काम सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. दर्जेदार कामासाठी वेळप्रसंगी कार्यकर्त्याने स्वतः वाईटपणा घेतला पाहिजे, अथवा मला कळविले पाहिजे. रस्त्यांच्या कामातील निकृष्टता खपवून घेतली जाणार नाही, असा सूचक इशारा मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी ठेकेदारांना दिला.
नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथे गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून मुकिंदपूर-गेवराई रस्ता ते नजीक चिंचोली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या तीस लाख रुपये खर्चाच्या कामाची सुरुवात शनिवारी झाली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे, शिवाजी पाठक, बाबुराव चावरे, सोसायटीचे अध्यक्ष भागचंद चावरे, माजी सरपंच बन्सी सातपुते, ईश्वर पाठक, बाळू गाडे, भागचंद महाराज पाठक, सरपंच वनमाला चावरे, उपसरपंच सोनल जाधव आदी उपस्थित होते.
उसतोडीच्या संदर्भात कोणी पैसे मागितले, तर त्या ठेकेदाराचे नाव सांगा. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणीही उसतोडीसाठी पैसे देऊ नये, असे आवाहन गडाख यांनी शेतकऱ्यांना केले.