शिर्डी : साईनगरीत साजरा होत असलेल्या १०१ व्या साई पुण्यतिथीनिमित्त मध्यान्हीला पारंपरिक पद्धतीने ‘आराधना’ विधी करण्यात आला़ पुण्यतिथीच्या दिवशी ‘आराधना’ किंवा ‘समाराधना विधी’ केला जातो़ जगभरातील करोडो भाविक पुण्यतिथीनिमित्त साईबाबांना सुवर्ण रथातून मिरवणूक माता-पिता व गुरूस्थानी मानत असल्याने या विधीला विशेष महत्व आहे़मंगळवारी सकाळी गावातून भिक्षा झोळी, सायंकाळी खंडोबा मंदिरात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम तर रात्री शहरातून साई प्रतिमेची सुवर्ण रथातून मिरवणूक काढण्यात आली. द्वारकामाईत सुरू असलेल्या अखंड साईसचरित्राच्या पारायणाची मंगळवारी पहाटे सांगता झाली़ त्यानंतर साईसच्चरित्र व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली़ यात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पोथी, संस्थानचे अधिकारी पंढरीनाथ शेकडे यांनी विणा, विठ्ठल बर्गे व राजेंद्र जगताप यांनी प्रतिमा घेऊन सहभाग नोंदवला. संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, अॅड. मोहन जयकर, स्मिता जयकर, नगराध्यक्षा अर्चना कोते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.आपल्या हयातीत बाबा रोज पाच घरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत. त्याप्रमाणे प्रतीकात्मक स्वरूपात सकाळी शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी संस्थानचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजता ह.भ.प. गंगाधरबुवा व्यास (डोंबिवली) यांचे कीर्तन झाले. बाबांच्या आगमनाची ओळख असलेल्या खंडोबा मंदिरात सायंकाळी दसºयाचे सीमोल्लंघन झाले. रात्री पंडीत सुगाटो भादुरी, कोलकत्ता यांच्या क्लासिकल मंडोलिन आणि भजन कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. रात्री ९.१५ वाजता श्रींच्या रथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या रथ मिरवणुकीत स्थानिक भजनी मंडळ, झांज पथक, लेझीम पथक, बॅन्ड पथक, तसेच ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले़
पुण्यतिथीनिमित्त साईबाबांची सुवर्ण रथातून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 12:58 PM