शिर्डी : महिलेचा हात धरुन मंदिराबाहेर काढल्याप्रकरणी साईबाबा मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे़ याप्रकरणी काँग्रसच्या पदाधिकारी असलेल्या जिल्ह्यातील महिलेने फिर्याद दिली आहे.
संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, आपली भावजय, पुतण्या, मैत्रिण यांच्यासह गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास साई मंदिरातील गाभाऱ्यात दर्शनासाठी गेलो होतो़ त्यावेळी जगताप तेथे आले. त्यांनी या कशाला येथे थांबल्या? यांना बाहेर हाकला? असे म्हणत माझा व भावजयीचा हात धरून बाहेर काढले आणि दमदाटीही केली. जगताप यांना संस्थानच्या सेवेतून तत्काळ निलंबीत करा, अशी मागणी त्या महिलेने केली आहे. जगताप यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला आहे़ मंदिरात सीसीटीव्ही बसवलेले आहेत़ ते पाहून माझे निर्दोषत्व आपोआप सिद्ध होईल़ मंदिरात शिस्त लावून भाविकांचे दर्शन सुखकर करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे़ त्यासाठी प्रयत्न करताना अनेक जण दुखावले जातात़ त्यातूनच हा आरोप करण्यात आल्याचे जगताप म्हणाले.