मसुरी येथील प्रशिक्षणाहून परतताच बगाटे यांनी या दोन्हीही प्रकल्पस्थानांना भेटी देऊन कामांना गती देण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पात हवेपासून ऑक्सिजन तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी रिलायन्स उद्योगाने जवळपास पावणेदोन कोटीची यंत्रसामग्री संस्थानला दिली आहे. या प्रकल्पासाठी चेन्नई येथील साईभक्त के. व्ही. रमणी यांनी पंचेचाळीस लाखांची मदत केली आहे.
साईनाथ रुग्णालयालगत यासाठी दीड हजार चौरस फुटांचे शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये बाहेरील तापमानाचा कोणताही फरक पडणार नाही. या प्रकल्पात रोज अडीचशे ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती होईल. तीनशे बेडसाठी चोवीस तास हा ऑक्सिजन पुरेल.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन आठवड्यात सिमेंट फौंडेशनसह शेड तयार करून ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यात आला आहे. डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे प्रमुख डॉक्टरांसह कामावर तळ ठोकून होते.
कोविड तपासण्याचे अहवाल उशिरा मिळत असल्याने साईसंस्थान स्वत:च कोविडची आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा उभारत आहे. प्रयोगशाळेची उभारणी युद्धपातळीवर सुरू असून येत्या आठवडाभरात या प्रयोगशाळेत तपासण्या सुरू होऊ शकतील. रोज एक हजार तपासण्या होतील व बारा तासांच्या आत अहवाल मिळू शकेल, असे बगाटे यांनी सांगितले.
.................