साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू -व्यंकय्या नायडु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:18 PM2017-12-23T14:18:10+5:302017-12-23T14:19:18+5:30
साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सूफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचा हा संदेश जगात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी केले.
शिर्डी : साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सूफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचा हा संदेश जगात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी केले.
साईबाबांचा संदेश प्रेम, वात्सल्य आणि माणसाला एकमेकांच्या हृदयाशी जोडण्याचा आहे. भेदभाव विसरून माणसावर प्रेम केल्यास श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम जीवनात होतो. अशा विचारांची प्रेरणा शिर्डीतून मिळते, असे मतही नायडु यांनी व्यक्त केले.
साईबाबा संस्थान आयोजित जागतिक साई मंदीर विश्वस्तांच्या परिषदेचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, पोस्ट मास्तर जनरल हरीश्चंद्र अग्रवाल, नगराध्यक्षा योगिता शेळके, संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, मोहन जयकर, प्रताप भोसले, मुख्यकार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल आदींची उपस्थिती होती. यावेळी पोस्टाच्या माय स्टॅम्पचे व संस्थान व्यवस्थापनाच्या वर्षपूर्ती अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत करणा-या उपराष्ट्रपतींनी हिंदी, इंग्रजी, तेलगु व संस्कृत भाषेतून उपस्थितांशी हृदयस्पर्शी संवाद साधला. वंचित आणि गरजूंची सेवा हीच खरी साई भक्ती व असहाय्य लोकांविषयी केवळ सहानुभूती न दाखविता त्यांच्या मदतीला धावून जाणे ही खरी प्रार्थना आहे. केवळ पूजाविधीत न गुंतता सद्बुद्धी, सदाचार आणि सेवाभावनेने मन:शांती मिळते, असे ते म्हणाले.
मानवसेवा हीच माधवसेवा असून माणसाबरोबरच पशू, पक्षी आणि निसर्गावर प्रेम करायला आपली संस्कृती शिकविते. हेच तत्वज्ञान साईबाबांनीदेखील सांगितले. त्यामुळे परिषदेच्या माध्यमातून चांगल्या अनुभवाचे आणि कल्पनांचे आदानप्रदान करीत भारतीयता आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.