श्रीरामपूर : सोनसाखळी चोरीतील नाशिक येथील अट्टल गुन्हेगार नईम शेख याचा साथीदार बलराम उर्फ बल्ली यादव (वय २४) यास शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याच्यावर सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल होते. त्याच्याकडे गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले.
मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्याकडे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.
आरोपी यादव याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पिंपरी-चिंचवड येथून चोरलेली ४० हजार रुपये किमतीची स्कूटर ही मिळून आली आहे. यादव हा शहरातील सरस्वती कॉलनीत राहतो. नाशिक येथे नईम शेख या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. यादव हा शेख याचा साथीदार होता. त्यामुळे तेथील पोलीस त्याच्या मागावर होते.
पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस हवालदार जोसेफ साळवे, बिरप्पा करमल, किशोर जाधव, राहुल नरवडे, पंकज गोसावी, राहुल गायकवाड यांनी ही कारवाई केली.