वाईन शॉपसह २६ हॉटेलला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:29 AM2019-04-20T11:29:16+5:302019-04-20T11:29:57+5:30
नियमभंग करून दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉप आणि हॉटेलचालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगलाच दणका दिला आहे़
अहमदनगर : नियमभंग करून दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉप आणि हॉटेलचालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगलाच दणका दिला आहे़ जिल्ह्यातील एका वाईनशॉपसह २६ हॉटेल बंद करण्याचे आदेश देत त्यांच्याकडून तीन दिवसांच्या आत खुलासा मागितला आहे़
लोकसभा निवडणूक काळात नियमबाह्य दारू विक्री होऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाने परवानाधारक दारुविक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी पाच पथके तैनात करण्यात आली होती़ या पथकाच्या तपासणीत २६ ठिकाणी नियमभंग झाल्याचे आढळून आले आहे़ यात दुकानाच्या बाहेरच मद्य सेवन करून देणे, परवाना नसताना दारुची विक्री, किरकोळ विक्रेत्यांना ठोक मद्य विक्री, मद्यविक्रीबाबत नोंद वही अद्ययावत न ठेवणे, निरीक्षणाच्यावेळी अभिलेख व इतर कागदपत्रे न दाखविणे, मद्याची नोंद न ठेवणे दुकाने उशीरापर्यंत उघडी ठेवणे आदी बाबी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली होती़ यामध्ये २६ परवानाधारक वगळता इतर बारा हॉटेल व वाईन शॉप विक्रेत्यांकडूनही तीन दिवसांच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे़
बंद करण्यात आलेल्या परवानाधारकांचा खुलासा जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येणार आहे़ यावर परवानाधारकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते़ या संदर्भात जिल्हाधिकारी जोपर्यंत निर्णय देणार नाहीत तोपर्यंत ही दारु दुकाने बंठ ठेवण्यात येणार आहेत़
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, उपाधीक्षक सी़पी़ निकम, निरीक्षक संजय सराफ, ए़बी़ बनकर, अनिल पाटील, एस़आऱ कुसळे, डी़पी़ बगाव, एस़डी़ परदेशी, बी़ टी़ घोरतळे, जी़आऱ चांदेकर, एस़एस़ भोसले, डी़बी़ पाटील आदींच्या पथकाने या कारवाई सहभाग घेतला होता़