विनोद गोळेपारनेर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक समता निर्माण केली. त्यांनी समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबविलेली परिवर्तन चळवळ आज दिशादर्शक ठरत आहे़ त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला पद्मश्री, पद्मविभूषण तसेच देश-परदेशातील पुरस्कारांपेक्षाही मोठा आनंद देणारा आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असलेला पुरस्कार हजारे यांना जाहीर झाला आहे. बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. आतापर्यंत आपण केलेल्या आंदोलनाच्या यशाचे गमक काय? असा प्रश्न विचारल्यावर, आपण कोणत्याही व्यक्ती, पक्ष, किंवा समूहाविरोधात आंदोलन केलेले नाही. समाजाचे हक्क व कर्तव्ये मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक चळवळीत काम करताना स्वत: शुध्द चारित्र्य व जीवन निष्कलंक असले पाहिजे, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात पाहिजे. त्यालाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे.अहिंसात्मक आंदोलन हेच यशआजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली. त्यात नेहमी आपल्या आंदोलनामुळे सामान्य माणसाला किंवा समाजाला त्रास होणार नाही, याची मी सातत्याने काळजी घेतली़ आंदोलन अहिंसात्मक असावे, यासाठी काटेकोर पालन केले. सन २०११ मध्ये दिल्लीत आंदोलन केले. त्यावेळी देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जगभरात आंदोलने शांततेत झाली. त्याचे जगभरातून कौतुक झाले. शांततेच्या मार्र्गाने आंदोलन केल्यानेच देशाला लोकपाल कायदा, लोकायुक्त, माहितीचा अधिकार, ग्रामसभेला अधिकार, बदल्यांचा कायदा, दारूबंदीसाठी ग्रामसभेला अधिकार यासह अनेक कायदे झाल्याचे हजारे यांनी सांगितले.अन् एक कोटी रूपयांचा पुरस्कार नाकारलाआजपर्यंत देशात, परदेशात अनेक पुरस्कार व कोट्यवधी रूपयांचे पुरस्कार मिळाले़ पण आपण नेहमी पुरस्कार कोण देतोय, याची खातरजमा केली. त्यामुळेच दिल्लीमध्ये एक संस्था देत असलेला एक कोटी रूपयांचा पुरस्कार आपण नाकारल्याचे हजारे यांनी सांगितले.