शिर्डी : मुंबई, हैदराबाद व दिल्ली पाठोपाठ साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रविवारी जयपूर, बंगळूरू, भोपाळ व अहमदाबाद या चार नवीन शहरांना विमान सेवा सुरू झाली़ १० जानेवारीपासून चेन्नईसुद्धा विमानसेवेने जोडले जाणार आहे. सव्वा वर्षापूर्वी शिर्डी विमानतळ वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर सुरूवातीला एअर इंडियाने मुंबई व हैदराबादसाठी विमान सेवा सुरू केली होती.
महिनाभरापूर्वी दिल्लीसाठी सेवा सुरू झाली. रविवारी आणखी चार अशी आतापर्यंत आठ शहरे शिर्डीशी जोडली गेली आहेत़ सध्या शिर्डीला रोज २० विमाने येत-जात आहेत़ पंधरवाड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता जयपूरवरून स्पाईस जेटचे विमान शिर्डीत उतरले़ त्यातून ५८ प्रवासी आले़ विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री व टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा यांनी केक कापून नव्या सेवेबद्दल आनंद व्यक्त केला. स्पाईस जेटच्या सहा फ्लाईटमधून रविवारी ५०८ प्रवासी आले तर ५२२ प्रवासी परत गेले़ याशिवाय एअर अलाईन्सच्या मुंबई, हैदराबादसह रोज जवळपास दीड हजारावर प्रवासी ये-जा करणार आहेत़जयपूर, भोपाळ व चेन्नईसाठी दररोज उड्डाणे जयपूर, भोपाळ व चेन्नईसाठी दररोज उड्डाणे होतील. बंगळुरूला मंगळवारी व अहमदाबादला रविवारखेरीज रोज सेवा सुरू राहील, असे दीपक शास्त्री यांनी सांगितले़