शिर्डीत भाजपा सरकारच्या पुतळ्याला जोडे मारून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:30 PM2018-03-03T19:30:12+5:302018-03-03T19:31:00+5:30
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त पसरविणा-या भाजप सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तसेच धनंजय मुंडे युवा मंचच्या पदाधिका-यांनी जोडे मारून संताप व्यक्त केला.
शिर्डी : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त पसरविणा-या भाजप सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तसेच धनंजय मुंडे युवा मंचच्या पदाधिका-यांनी जोडे मारून संताप व्यक्त केला. याशिवाय प्रांताधिका-यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेऊन आंदोलकांवर कारवाई केली.
शनिवारी दुपारी नगरपंचायत शेजारील मैदानावर हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते म्हणाले, राज्यभर सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनातून धनंजय मुंडे हे शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे प्रश्न मांडत आहेत. अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, शिष्यवृत्ती यासारख्या मुद्यांवरुन जनतेचे लक्ष वळविण्यासाठी भाजपने मुंडेंची बदनामी केली आहे. विरोधी पक्षाला बदनाम करण्यासाठी त्यांचे हे कृत्य नीच आहे. मात्र त्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे पुराव्यातून समोर आले आहे.
धनंजय मुंडे युवा मंचचे विशाल भडांगे यांनी सरकारने मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपासाठी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन पोलिसांनी आमच्या लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनावर केलेली कारवाई हा देखील लोकशाही चिरडण्याचाच एक प्रकार असल्याचे सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी सरकारचा निषेध केला़ यावेळी प्रकाश गोंदकर, प्रसाद पाटील, विशाल भडांगे, विशाल कोते, सिद्धार्थ गोतिस, अमित कुटे, निखिल चांगले, भाऊसाहेब डिघोळे, रवी जायभाये, साहिल शेख, आसिम खान,सईद शेख, गौरव कोते, दिपेश वारिअर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.