श्रीरामपूर : शिर्डी फास्ट पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यास साईभक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे या गाडीला एक्स्प्रेसचा दर्जा देण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. शिर्डी पॅसेंजर (५१०३३/५१०३४) ही रेल्वे आठ डब्यांची आहे. त्याऐवजी ती स्वतंत्रपणे चालणारी १८ डब्यांची करावी, याकरिता प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समिती सदस्य पाच वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यास यश आल्याचे दिसत आहे. शिर्डी पॅसेंजरला १९ डबे देऊन ती दौंड-पुणे बायपासमार्गे चालविण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
साईभक्तांना १०० ते १२५ रुपये दराने मुंबईला जाण्याची सोय या गाडीमुळे उपलब्ध झाली आहे. मात्र, पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यास रेल्वे तिकिटात मोठी वाढ होईल. त्याचबरोबर गाडी उशिरा सोडून मुंबई येथे सकाळी ६ वाजता पोहोचेल अशी वेळ निर्धारित करावी, या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.