शिर्डीतील लग्नसोहळ्यात साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 07:22 PM2017-11-21T19:22:37+5:302017-11-21T19:27:00+5:30
शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित लग्नसोहळ्यात सोमवारी रात्री चोरट्यांनी वराच्या चुलतीची पर्स पळवून रोख रक्कम व सोने असा जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला.
शिर्डी : येथील एका हॉटेलमध्ये आयोजित लग्नसोहळ्यात सोमवारी रात्री चोरट्यांनी वराच्या चुलतीची पर्स पळवून रोख रक्कम व सोने असा जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला.
याबाबत वर्षा जैन (रा. इंदोर) यांनी शिर्डी पोलिसात सोमवारी रात्री फिर्याद दाखल केली. त्यानुसार या पर्समध्ये पंचवीस हजार रुपये रोख व पंचवीस तोळे सोन्याचे दागिने होते. यात सोन्याचे तीन नेकलेस, कानातील सहा कर्णफुले, मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, नाकातील पाच नथ, एक ब्रासलेट, दोन चेन, घड्याळ, चांदीचा शिक्का व आधार कार्ड होते. या सर्व ऐवजाची किंमत साडेसहा लाख रुपये आहे.
इंदोर येथील जैन परिवार व कोपरगाव येथील अजमेरा परिवार यांचा विवाह सोहळा शिर्डीतील पुष्पक रिसॉर्ट येथे मंगळवारी आयोजित केला होता. यासाठी दोन्ही परिवार आपल्या नातलगांसह सोमवारी शिर्डीत दाखल झाले होते. लग्नानिमित्त हॉटेलमागे उभारलेल्या शामियान्यात रात्री संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात नवरेदवाची इंदोर येथील चुलती वर्षा संजय जैन सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपले वापरण्याचे व बहिणीचे दागिने चॉकलेटी पर्समध्ये बरोबर घेतले होते़ कार्यक्रमस्थळी रात्री आठसाडे आठच्या सुमारास त्या नातेवाइकांसह गप्पा मारीत असताना त्यांनी जवळच्या खुर्चीवर पर्स ठेवली होती़ त्यावेळी चोरट्यांनी ही पर्स पळविली.
अनेक जण साईनगरीतील विविध हॉटेल किंवा लॉन्सला विवाहसोहळ्याचे आयोजन करीत असतात. मात्र गेल्या एक दोन वर्षांत काही विवाहसोहळ्यांतून महिलांच्या सोने ठेवलेल्या पर्स चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. चोरटे लहान मुलांच्या मदतीने या चो-या करीत असल्याचेही वारंवार समोर आले आहे. मात्र विवाहस्थळी नातेवाइकांसारख्या वावरणा-या व्यक्तींना किंवा लहान मुलांना हटकणे सुरक्षारक्षकांना अवघड असते. चोरी झाल्यानंतर तपासासाठी केवळ सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहावे लागते. सोमवारच्या घटनेतही लाल रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणावर संशय आहे. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप कहाळे सीसीटीव्ही फुटेज व अन्य मार्गाने आरोपीचा शोध घेत आहेत.