संगमनेर : शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व त्याचा मित्र प्रशांत प्रभाकर झावरे या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली.नगरसेवक घोरपडे व त्याचा मित्र झावरे हे दोघे गुरूवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एकाला घेवून घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी रूग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचा-यांना डॉक्टर कुठे आहेत? अशी विचारणा केल्यानंतर कर्मचा-यांनी लगेचच डॉ. संदिप कचेरीया यांना याबाबत भमण्रध्वनीवरुन कल्पना दिली.डॉक्टर रूग्णालयात येण्याअगोदर काही काळ घोरपडे व झावरे यांनी तेथे उपस्थित असणा-यांना सरकारी कर्मचा-यांना शिवीगाळ व धक्काबुकी करत जीवे मारण्याची धमकी दिली. डॉ. कचेरीया हे तेथे तात्काळ उपस्थित झाले त्यानंतर त्यांनी जखमी रूग्णावर उपचार केले. घोरपडे व त्याचा मित्र झावरे या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी रूग्णालयातील कर्मचारी दादा लल्लु साबळे यांनी दिलेल्या फिर्यादवरून घोरपडे व झावरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
डॉक्टरांना शिवीगाळ करणा-या संगमनेर पालिकेच्या शिवसेना नगरसेवकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 5:39 PM