अहमदनगर: शेवगाव येथील श्रीराम मंदिराची जागा भाडेकरुंना भाडेपट्ट्याने देण्याचे करार विश्वस्तांच्या अंगलट आले आहेत. या देवस्थानच्या जागेतील परमीटरुम बंद करा, असा आदेश दिल्यानंतरही संबंधित परमीटरुम धारक हा आदेश पाळायला तयार नाहीत.श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडे देवस्थानच्या देखभालीसाठी ३१ एकर भूखंड इनाम म्हणून आहे. मात्र, या भूखंडांचे तुकडे करुन विश्वस्त मंडळाने ते भाडेतत्वावर दिले. हे भाडेकरार केल्यानंतर भाडेकरुंनी या जागेत टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. दोन भाडेकरुंनी तर चक्क परमीट रुम उभारले आहेत. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर धर्मादाय आयुक्तांमार्फत या देवस्थानची चौकशी सुरु आहे. प्रारंभी नगरच्या धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने गोलमाल अहवाल सादर करत विश्वस्तांना पाठिशी घालण्याचा प्रकार केला.या अहवालाची ‘लोकमत’ने चिकित्सा केल्यानंतर फेरचौकशी करण्याचा आदेश झाला. हा चौकशी अहवाल पुणे येथील सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे दाखल झाला आहे.सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी याबाबत नगरला येऊन सुनावणी घेतली आहे. परमीट रुम तातडीने बंद करा असा आदेश त्यांनी विश्वस्तांना दिला आहे. त्यानंतर विश्वस्तांनी या जागेतील दोन्ही परमीटरुम धारकांना आपले हे व्यवसाय बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यापैकी एका परमीटरुम धारकाने आपण व्यवसाय बंद केल्याचे विश्वस्तांना कळविले आहे. तर दुसऱ्या परमीटरुम धारकाने मात्र व्यवसाय बंद करण्यास नकार दिला आहे. या परमीटरुम धारकाचा परवाना पुढे वाढवू नये, असे विश्वस्तांनी उत्पादन शुल्क विभागाला कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.विश्वस्तांचा नियमबाह्य कारभार चव्हाट्यावरआम्ही भूखंडांची योग्य पद्धतीने देखभाल करत आहोत, असा जबाब विश्वस्तांनी धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाच्या चौकशी समितीसमोर दिला होता. प्रत्यक्षात भाडेकरु त्यांना दाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विश्वस्तांनी व्यवस्थित अटी, शर्ती न टाकता भाडेकरार केले हे उघड होत आहे.धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनीही या बाबी आजवर दुर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची भूमिका तक्रारदार शेख आयुब यांनी घेतली आहे. शेख यांनी नगरच्या धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाच्या कामकाजाबाबतही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.
श्रीराम मंदिर भूखंड घोटाळा: धर्मादाय सहआयुक्तांच्या आदेशानंतरही परमीटरुम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 1:57 PM