साऊथ गँगमधील सहा लुटारू गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:53 AM2018-08-29T11:53:49+5:302018-08-29T11:54:14+5:30
दीड वर्षापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या दक्षिणेतील चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत़ महिनाभरापूर्वी नगर शहरात डॉ. एस. एस. दीपक यांचा ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सहा लुटारूंना तोफखाना पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे.
अहमदनगर : दीड वर्षापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या दक्षिणेतील चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत़ महिनाभरापूर्वी नगर शहरात डॉ. एस. एस. दीपक यांचा ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सहा लुटारूंना तोफखाना पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे.
भोजरात सतीष (वय ३३), मुरगन कन्नन (वय २९), मुरगन्न प्रभाकरन, मुरगन साथीवेल (वय २०), लक्ष्मीनन नारायण (वय ४०), विजयन सितारामन (वय ५७ सर्व रा. गांधीनगर, थीरूची, तामीळनाडू ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सहा जणांनी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता शहरातील दीपक हॉस्पिटलजवळ चोरट्यांनी डॉ. एस. एस. दीपक यांच्या कारचालकाचे लक्ष विचलित करून कारमधील दोन आयपॉड व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली होती.
याबाबत डॉ. दीपक यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी या चोरट्यांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती. तोफखाना ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र खोंड, पोलीस नाईक विक्रम वाघमारे, हनुमंत आव्हाड व ज्ञानेश्वर मोरे यांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील बेलमपल्ली येथून ताब्यात घेतले.
पंजाब ते शिर्डी़़ चोरीचा मार्ग
तोफखाना पोलिसांनी पकडलेल्या सहा जणांच्या टोळीत आणखी सदस्यांचा समावेश आहे. हे चोरटे तामीळनाडूतील हरबजकलानी या परिसरात अलिशान घरात राहतात. हे चोरटे चोरीसाठी एक रूट निश्चित करतात. डॉ. दीपक यांचा मुद्देमाल चोरला तेव्हा हे चोरटे पंजाब येथून नगरमध्ये दाखल झाले होते. एका शहरात चोरी केल्यानंतर तेथे एक ते दोन दुचाकी चोरून पुढच्या शहरात जायचे तेथे एका ठिकाणी चोरी केली की लगेच दुस-या शहरात ट्रेन अथवा चोरीच्या दुचाकीने ते प्रवास करत होते.