..म्हणून मी लय वेड्यावाणी करते! श्रीगोंद्याच्या पूनम तुपेचा टिकटॉकवर जलवा; व्हिडिओंना ५० लाख लाईक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:29 AM2020-05-19T11:29:06+5:302020-05-19T11:30:48+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाºया पूनम संजय तुपे यांचा ‘..म्हणून मी लय वेड्यावाणी करते’, हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच गाजतो आहे. वर्षभरात पूनम यांच्या विविध व्हिडिओंना ५० लाख ‘लाईक्स’ मिळाले तर त्यांचे १ लाख ६८ फॉलोअर्स आहेत.
बाळासाहेब काकडे / श्रीगोंदा : तालुक्यातील पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाºया पूनम संजय तुपे यांचा ‘..म्हणून मी लय वेड्यावाणी करते’, हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच गाजतो आहे. वर्षभरात पूनम यांच्या विविध व्हिडिओंना ५० लाख ‘लाईक्स’ मिळाले तर त्यांचे १ लाख ६८ फॉलोअर्स आहेत.
पूनम यांचे मूळगाव इंदापूर तालुक्यातील वरकुटे. शिक्षण सातवीपर्यंत झाले आणि २००८ मध्ये पिसोरेखांड येथील संजय तुपे यांच्याशी विवाह झाला. संजय हे श्रीगोंदा येथे एका किराणा दुकानात हमाली करतात. पूनम या शिलाई मशीनचे काम करतात. त्यांना किरण, अपूर्वा, शिवन्या या तीन मुली आहेत.
घरी अठराविश्व दारिद्रय. राहण्यास साधे पक्के घरीही नाही. निवारा म्हणून आहे ते साधे छप्पर. पूनम यांनी काही दिवसांपूर्वी सचिन देवकुळे यांच्याकडून टिकटॉक अॅप डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर मराठी, हिंदी गाण्याचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली. पूनम यांचे व्हिडिओ पाहून काहींनी ‘बया जरा वेडी आहे, बधीर आहे’ अशी टिंगल केली. त्यावर पूनम यांनी ‘..म्हणूनच मी लय वेड्यावाणी करते’, हा व्हिडिओ टिकटॉकवर टाकला. त्यानंतर या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पूनम दररोज पाच व्हिडिओ टाकतात. या कामात पती संजय मदत करतात. पूनम यांच्या व्हिडिओंना ५० लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या असून त्यांचे १ लाख ६८ हजार फॉलोअर्स आहेत. पूनम यांच्याकडे कोणतेही तंत्रज्ञान नाही. त्यांना पती सोडता कोणाचे सहकार्यही नाही. तरी त्या व्हिडिओ बनविण्याचे काम स्वत:च करतात. केवळ जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्य याच्या बळावर ते नित्यनियमितपणे दररोजच्या जीवन संघर्षावर आधारित व्हिडिओ बनवितात.
वेडेपणातही आनंदच..
मला लोक वेडी म्हणायचे. शहाणं होऊन राहण्यापेक्षा वेड होऊन राहण्यात मला आनंद मिळतो. काही जण माझ्या विरोधात कमेंट टाकतात. या कमेंटमधूनच माझ्या नवीन व्हिडिओचा जन्म होतो. यातून मला ऊर्जा मिळते, असे पूनम तुपे यांनी सांगितले.