श्रीगोंद्यात स्मशानभूमीच्या जागेचा वाद उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:49 AM2018-08-11T11:49:45+5:302018-08-11T11:50:11+5:30
अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद उफाळला. मात्र येडे यांच्या नातेवाईकांनी स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करुन वादावर पडदा टाकला.
श्रीगोंदा : महानुभाव पंथाची दिक्षा स्विकारलेले गणेश उर्फ आबासाहेब रंगनाथ येडे (वय - ४२ रा. होळी गल्ली, श्रीगोंदा) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद उफाळला. मात्र येडे यांच्या नातेवाईकांनी स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करुन वादावर पडदा टाकला.
गणेश यांचा मृतदेह दफन करण्यासाठी खंडोबा मंदिराजवळील स्मशानभुमीत आणला. मात्र काही मंडळींनी मृतदेह दफन करण्यासाठी विरोध केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर तब्बल चार तासांनी पोलिस बंदोबस्तात गणेश येडे यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. वादापुर्वी पोलिस उपनिरीक्षक निलेश कांबळे पोलिस पथकासह स्मशानभुमीत दाखल झाले. गणेश येडे यांचे दफन करू द्या, अशीही विनंती विरोध करणारांना कांबळे यांनी केली. तहसीलदार महेंद्र महाजन व मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांच्याशीही चर्चा केली. तरी काही लोक अंत्यविधी करू देण्यास तयार नव्हते. पोलिस स्टेशन समोर दफन करा, अशी आक्रमक भुमिका विरोधकांनी घेतली. त्यानंतर गणेश यांच्या नातेवाईकांनीच आमच्यासाठी वाद घालू नका, असे म्हणत स्वत:च्या शेतात अंत्यविधी केला.
याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, पोलीस उपनिरीक्षक निलेश कांबळे, गुलाबराव खेंडके, बापूसाहेब गोरे, एम.डी. शिंदे, राजू गोरे, अख्तरभाई शेख, नानासाहेब कोथिंबीरे,डॉ. अनिल घोडके, चंद्रकांत आमले, संतोष खेतमाळीस, संतोष इथापे, गणेश श्रीराम, सुरेश भंडारी यांनी येडे यांना श्रद्धांजली वाहिली.
स्मशानभुमीसाठी जागेची मागणी
अनेक पिढ्यांपासून खंडोबा मंदिरासमोरील स्मशानभुमीत गवळी, लिंगायत, महानुभाव पंथातील दफन संस्कार केले जातात. पण काही मंडळी याबाबत वाद घालत आहेत. आम्ही अल्पसंंख्याक असल्याने वाद करू शकत नाही, आम्हाला पालिकेने स्मशानभुमीसाठी जागा द्यावी, अशी मागणी या समाजातील मंडळींनी केली.
स्मशानभुमीसाठी नवी जागा
शहरातील आनंदकर मळ्यात साडेतीन एकर जागा हिंदू स्मशान भूमीसाठी राखीव आहे. त्यामधील अर्धा एकर जागा दफनभूमीसाठी दिली जाईल. त्यास कुंपनही करण्यात येईल.- मनोहर पोटे, नगराध्यक्ष, श्रीगोंदा