पाण्यासाठी महापालिकेत ठिय्या
By Admin | Published: March 16, 2016 08:29 AM2016-03-16T08:29:00+5:302016-03-16T08:29:08+5:30
अहमदनगर : महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा व ठेकेदारावर नसलेल्या नियंत्रणामुळे कल्याण रस्ता परिसरातील हजारो नागरिकांच्या वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
अहमदनगर : महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा व ठेकेदारावर नसलेल्या नियंत्रणामुळे कल्याण रस्ता परिसरातील हजारो नागरिकांच्या वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नगरसेविकेने पाठपुरावा करूनही प्रशासनाने पाणीप्रश्न सोडविला नाही, त्यामुळे संतापलेल्या सुमारे पाचशे नागरिकांनी महापालिकेवर मंगळवारी मोर्चा काढला. सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या दालनाबाहेर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. तत्काळ काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नगरसेविका उषा शरद ठाणगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा आणला. मोर्चा येणार असल्याने मनपा प्रशासनाने अगोदरच पोलीस बंदोबस्त मागविला होता. मुख्य प्रशासकीय इमारतीत नागरिकांनी ठिय्या मांडला. आमचा प्रभाग टॅँकरमुक्त करा, अशी मागणी करत प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर, प्रशांत सोसायटी, भृंगऋषी सोसायटीसह अन्य वसाहतींत पाण्याची समस्या आहे. रात्री-बेरात्री सुटणारे पाणी, काही भागांना तर टॅँकरने पाणी पुरवठा यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. फेज टू पाणी योजनेची पाईपलाईन टाकून झाली, फक्त सीना नदीवरील पुलावर लाईन टाकणे बाकी आहे. मात्र, गत दोन वर्षांपासून ही लाईन टाकलेली नाही. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, नगरसेविका उषा ठाणगे यांच्यासमोबत प्रशासनाची बैठक झाली, पण तरीही प्रशासनाने हे काम केले नाही. परिणामी या भागातील पाणी समस्या कायम आहे.
पाणी योजनेच्या ठेकेदाराने हे काम करण्यास नकार दिला आहे. मनपाचा अंदाजीत खर्च व ठेकेदाराचा खर्च यात तफावत असल्याने हे काम होत नाही. ठेकेदार काम करत नसेल तर स्वखर्चातून काम करण्याची तयारीही उषा ठाणगे यांनी दाखविली. आयुक्त विलास ढगे यांनी तत्काळ ठेकेदाराशी संपर्क साधून काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसे लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. त्यानंतर मोर्चा माघारी घेण्यात आला.
नगरसेविका उषा ठाणगे यांनी सीना नदीच्या पुलावरील पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. ही लाईन टाकून झाली तरी कल्याण रस्ता परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सूटणार आहे. उपायुक्त अजय चारठाणकर, पाणी पुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्याशी चर्चा केली. दिवाळीनंतर पंधरा दिवसात पुलावरील पाईपलाईन टाकून दोन महिन्यात पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अजूनपर्यंत ही लाईन सुरू झालेली नाही. ही नागरिकांची फसवणूक असल्याचे ठाणगे यांचे म्हणणे आहे.