नागापूर, बोल्हेगाव परिसरात तातडीने कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:17+5:302021-04-20T04:22:17+5:30
अहमदनगर : नागापूर, बोल्हेगाव परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे ...
अहमदनगर : नागापूर, बोल्हेगाव परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने या भागात तातडीने कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी सेनेच्या नगरसेविका कमल सप्रे यांनी आयुक्तांकडे सोमवारी केली.
नगरसेविका सप्रे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागापूर, बोल्हेगाव परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. कोरोनामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने कामगार गावाकडे जात आहेत. त्यामुळे येथील कारखान्यांना कामगार मिळणार नाहीत. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरही होणार आहे. खासगी रुग्णालयांत बेड मिळणे कठीण झाले आहे. महापालिकेकडून आरोग्य सुविधा पुरविल्या जात नाहीत. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना धीर देण्याची गरज आहे. नागरिक मदतीची मागणी करत आहेत. या भागात वखार महामंडळाचे मोठे गोदाम आहे. ते सध्या रिकामे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने या इमारतीत मोठे कोविड केअर सेंटर सुरू करणे शक्य आहे. त्यामुळे या भागाची पाहणी करून तातडीने कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी सप्रे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.