खासगी रुग्णालयाकडून नागरिकांची होणारी लूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:21 AM2021-04-21T04:21:01+5:302021-04-21T04:21:01+5:30
राहाता : शहरात खासगी रुग्णालयांकडून सर्वसामान्य रुग्णांची लूट तात्काळ बंद करावी, तसेच बिल तपासणी समित्यांनी फक्त बिल तपासणीची औपचारिकता ...
राहाता : शहरात खासगी रुग्णालयांकडून सर्वसामान्य रुग्णांची लूट तात्काळ बंद करावी, तसेच बिल तपासणी समित्यांनी फक्त बिल तपासणीची औपचारिकता पूर्ण न करता, यापूर्वी सामान्य रुग्णांकडून जास्तीचे घेतलेले पैसे परत करून या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिपाडा म्हणाले, राज्य शासनाने कोरोनासंदर्भात निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा बिलाची आकारणी करू नये, रुग्णालयांकडून निश्चित केलेल्या दरातील अंतर्भूत शुल्काव्यतिरिक्त जादा आकारणी होत असून, शहरात रुग्णांची लूट होत आहे. राहात्यातील खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांकडून ज्यादा दराने रुग्णांकडून बिलांची आकारणी सुरू आहे; परंतु शासनाच्या कचाट्यात सापडून चौकशी मागे लागू नये म्हणून ते रुग्णांना बिलेच देत नाहीत. शासनाच्या कुठल्याही नियमांचे ते पालन करत नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन लूट करणाऱ्याला शासनाने धडा शिकवण्याची गरज आहे. कोविड सेंटरकडून होणाऱ्या लुटीसंदर्भात जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर चीड निर्माण झाली असून, असंतोषाचा भडका उडू शकतो, याचे भान लुटणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलने ठेवावे. कोविड सेंटरच्या रूममध्ये जेमतेम सुविधा असताना व काही काळाकरिता ऑक्सिजन लावून जास्तीत जास्त ४० ते ५० हजार होणारे बिल दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत केले जाते. रूमची अवस्था पाहून रुग्णांना तेथे थांबावेही वाटत नाही. हे अतिशय गंभीर आहे.