उकांडाफाटा येथे एकाच दिवशी दोन रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:24 AM2021-09-24T04:24:47+5:302021-09-24T04:24:47+5:30
खरवंडी कासार : खरवंडी कासार (ता. पाथर्डी) परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उकांडाफाटा भालगाव (ता.पाथर्डी) येथे दोन वेगवेगळ्या गटांनी एकाच ...
खरवंडी कासार : खरवंडी कासार (ता. पाथर्डी) परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उकांडाफाटा भालगाव (ता.पाथर्डी) येथे दोन वेगवेगळ्या गटांनी एकाच दिवशी (गुरुवारी, दि.२३) रास्ता रोको आंदोलन केले.
खरवंडी, भालगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५१ व ३६१ मार्गाच्या लगतच्या शेतकऱ्यांना साइड गटार व रस्ता तयार करून द्यावा. महामार्गालगतचा रस्ता १०० मीटर कॉंक्रिटीकरण करावा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५१ व ३६१ महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा.
पीक विमा कंपनीकडून गेल्या तीन वर्षांचा पीक विमा मंजूर करून त्वरित मिळावा. ७/१२ ऑनलाईन पीक पेरा लावण्यासाठी पूर्वीप्रमाणे नोंद करावी. राष्ट्रीय महामार्ग ३६१ चे काम जलद गतीने पूर्ण करावे, आदी मागण्यांसाठी माजी सरपंच अंकुशराव कासुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव सुपेकर, बाळू काकडे, जनार्दन खेडकर, बाळू खेडकर, विष्णू थोरात, सुदाम खेडकर, बाळासाहेब खेडकर, सुरेश खेडकर, सुभाष काळे, बाळासाहेब ढाकणे, बाळासाहेब बनसोडे आदी सहभागी झाले होते.
भालगाव येथील उकांडाफाटा येथेच भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पैठण-पंढरपूर आणि खरवंडी कासार-लोहा राष्ट्रीय महामार्गामध्ये गेलेल्या जमिनींचा शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. रस्त्याच्या बाजूने गटार नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. महामार्गाच्या कामामुळे अनेकांना स्वतःच्या घरात, शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. अवकाळीचे पंचनामे झाले नाहीत, आदी मुद्दे निवेदनात उपस्थित केले आहेत.
यावेळी अशोक खरमाटे, गणेश सुपेकर, वकील भाग्यश्री ढाकणे, कैलास खरमाटे, उद्धव खेडकर, रशीद तांबोळी, तुकाराम खेडकर, दत्तू पठाडे, जगन्नाथ गुळवे, गहिनीनाथ ढाकणे, जगन्नाथ खेडकर आदींसह परिसरातील गावांमधील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, कृषी मंडलाधिकारी मोहनसिंग राजपूत, खटावकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे ही दोन्ही आंदोलने एकाचवेळी सुरू झाली होती.
---
आश्वासनानंतर आंदोलन मागे...
आंदोलनस्थळी दोन्ही महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार हजर होते. त्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल. रस्त्याच्या बाजूने नालीचे काम सुरू करू, असे अश्वासन दिले. महसूलच्या अधिकऱ्यांनी शेतीच्या झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी अहवाल पाठवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
----
दोन फोटो
२३ खरवंडी बीजेपी
२३ खरवंडी सरपंच