लोणी/राहाता : एका ७४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांने दोन, तीन वर्षापासून सततची नापिकी आणि यावर्षी पेरलेले मकाचे बियाणे उगवले नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी गोगलगाव (ता.राहाता) येथे घडली. बाबा महादू मगर असे या वृद्ध शेतकºयाचे नाव आहे.गोगलगाव शिवारात संगमनेर रस्त्यावर गायकर लावणात त्यांच्या मालकीची दोन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. याच शेतजमिनीत १५ दिवसापूर्वी मगर यांनी हायटेक (सोना) ५१०१ या सिडस् कंपनीची हायब्रिड मक्याचे बी सरी पध्दतीने पेरले होते. मात्र दोन आठवडे उलटून गेले तरी हे मक्याचे बी उगवले नाही म्हणून मगर हे चिंतातूर झाले. यातूनच आलेल्या नैराश्यातून त्यांनी शनिवारी (१३ जुलै) सकाळी ८ वाजता आपल्या घरी टिकटॉक हे गोचिड मारण्याचे विषारी औषध सेवन केले. मगर यांच्या मुलांचा ही बाब लक्षात आल्याने त्यांनी लागलीच त्यांना प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी रात्री मगर या वृद्ध शेतकºयाची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदनानंतर मंगळवारी दुपारी दोन वाजता गोगलगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मगर यांच्या मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.घटनेबाबत गोगलगावचे कामगार तलाठी बी.एफ.कोळगे यांनी कृषी पर्यवेक्षण अधिकारी नारायणराव लोळगे व कृषी सहाय्यक सचिन गायकवाड यांना सोबत घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करून मगर यांच्या वारसांना शेतकरी आत्महत्या आर्थिक योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.
वृद्ध शेतक-याची आत्महत्या : गोगलगाव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 5:41 PM