रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुरेशा उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:21 AM2021-04-21T04:21:04+5:302021-04-21T04:21:04+5:30
कोपरगाव : सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने लढत आहे. मात्र, पुरेशा साधनसामुग्री अभावी रुग्णांना ...
कोपरगाव : सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने लढत आहे. मात्र, पुरेशा साधनसामुग्री अभावी रुग्णांना सेवा देण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे कोपरगांव विधानसभा मतदार संघातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णवाढ रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून संसर्ग झालेल्या रुग्णांना पुरेशी वैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत असून नातेवाईकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, परंतु यासाठी लागणारी साधन सामग्री, सोयी-सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांना सेवा देण्यास अडथळे येत आहेत.
तालुक्यात व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविण्यात यावी, एचआरसीटी चाचणी करण्यासाठी केवळ एकच खाजगी लॅब उपलब्ध असल्याने मशीनची उपलब्धता करुन द्यावी. त्याचप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शन, रुग्णांना लागणारा ऑक्सिजन याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे यासाठी तत्काळ उपयायोजना कराव्यात. अँटिजन चाचणीची वेळ वाढवावी, एचआरसीटी चाचणी कमी दरामध्ये उपलब्ध करुन द्यावी. मतदार संघासाठी कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन द्यावी, त्याचप्रमाणे संशयित रुग्णांना विलगीकरण कक्ष नसल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे यासाठी गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरु करावे. त्यावर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण असावे. शिर्डी येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरमध्ये कोपरगाव तालुक्यातील रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी तेथील प्रशासनाला सूचना कराव्यात.