केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या महिलेचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांच्या वतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
नगर-औरंगाबाद महामार्गावर, जामखेड रोड, सोलापूर रोड, तसेच नगर शहरात ही महिला फिरत असते. वाहनचालकांना लिफ्ट मागून काही अंतर गेल्यावर महिला स्वतःला अधिकारी असल्याचे सांगते. त्यानंतर वाहनचालकाला लुटते. एखाद्या चालकाने पैसै देण्यास नकार दिल्यास आरडाओरड करून खोटी केस करण्याची धमकी देते. अनेक वाहनचालकांना आपण लुटले गेल्याची खात्री असूनही समोर महिला असल्याने व खोटी केस दाखल होण्याच्या भीतीपोटी तिच्याविरोधात कोणी तक्रार दाखल करण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे तिचे धाडस दिवसेंदिवस वाढतच आहे. तिच्या या कृत्यांना आजपर्यंत अनेकजण बळी पडलेले आहेत. जेऊर गावातील नागरिकांनाही तिच्याकडून त्रास सुरू झाला असून काही नागरिकांवर केस दाखल करण्याचे प्रकार तिच्याकडून घडलेले आहेत. त्यामुळे या महिलेच्या उद्योगांची चौकशी करून तिचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर उपसरपंच श्रीतेश पवार, ग्रामपंचायत सदस्य गणेश तवले, माजी उपसरपंच बंडू पवार, पप्पू ससे, साहिल शेख यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.
310521\img-20210531-wa0414.jpg
जेऊर फोटो