तनपुरे साखर कारखाना पुन्हा व्हेन्टिलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 02:44 PM2019-12-15T14:44:50+5:302019-12-15T14:45:19+5:30
राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा पुन्हा व्हॅन्टिलेटरवर आहे. दोन गळीत हंगामानंतर आर्थिक संकटात सापडलेला कारखाना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून खासदार डॉ़ सुजय विखे यांच्या ताब्यात आला. विखे यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन वर्षांपूर्वी कारखाना सुरू केला. मात्र यंदा राहुरी तालुक्यात ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे.
भाऊसाहेब येवले ।
राहुरी : महाराष्ट्रात ऐके काळी दबदबा असलेला राहुरी येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा पुन्हा व्हॅन्टिलेटरवर आहे. दोन गळीत हंगामानंतर आर्थिक संकटात सापडलेला कारखाना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात आला. विखे यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन वर्षांपूर्वी कारखाना सुरू केला. मात्र यंदा राहुरी तालुक्यात ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे राहुरीचे आर्थिकचक्र अडचणीत आले आहे.
तत्कालीन अध्यक्ष रामदास पाटील धुमाळ यांनी २१०५ रूपये प्रतिटन उचांकी भाव देऊन स्पर्धा निर्माण केली होती. तनपुरे कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत असताना सत्तांतर घडून आले. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे आली. मात्र कर्जाचे ओझे न पेलावल्याने तीन गळीत हंगामानंतर कारखाना बंद पडला. त्यामुळे तनपुरे यांनी नजिकच्या काळात मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. विखे यांच्या ताब्यात कारखाना आला. अनेक अडचणींवर मात करीत विखे यांनी कारखान्याचे चाक फिरविण्यात यश संपादन केले. मात्र यावर्षी तनपुरे कारखाना बंद राहिल्याने ऊस उत्पादक व कारखान्याचे कामगार यांच्यामध्ये कमालीची नाराजी उफाळून आली आहे. विखे यांनी खासदारकीची घोषणा ज्या तनपुरे कारखान्यावर केली होती. तिथेच नाराजी वाढली. १७ डिसेंबर रोजी कामगार आमरण उपोषण करणार आहेत. ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे. विखे यांच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर कामगारांचे साडेसतरा कोटी रूपये पगार व प्रॉव्हिडंड फंड देणे आहे. त्यापूर्वीचे ९० कोटी रूपये कामगारांचे देणे आहे. ऊस उत्पादकांचे थकीत देणे संचालक मंडळाने दिले. तनपुरे कारखान्यावर कामगार, शासकीय देणे व बँके चे कर्ज मिळून साडेतीनशे कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम देणे आहे. तनपुरे कारखान्यावरील वीज व पाणी पुरवठा बंद आहे.
पुढील वर्षावर भिस्त़
यंदा राहुरी तालुक्यात उसाच्या लागवडीला सुरूवात झाली आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील वर्षी पुरेशा प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार आहे. त्याग करणारा छोटा शेतकरी सदैव राहुरी कारखान्याचा कैवारी ठरला आहे. त्यामुळे शेतकरी ऊस देईल़ याशिवाय कामगारही मदतीचा हात देऊ शकतात. पुढील वर्षी संचालक मंडळाने नियोजन केले तर तनपुरे कारखाना यशस्वीपणे गळीत हंगाम करून शकतो.