अहमदनगर : स्थानिक चौकशी समितीवर प्रचंड दबाव असू शकतो. त्यामुळे या समितीसमोर मी माझी बाजू मांडणार नाही. चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यमांशी बोलताना केली. देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या चौकशी समितीची पहिली सुनावणी सोमवारी सकाळपासून सुरू झाली. या समितीमध्ये देवरे यांनाही पाचारण करण्यात आले होते. देवरे या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. मात्र त्यांनी चौकशी समितीसमोर जाण्यास नकार दिला. याबाबत माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'मी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची दुपारी भेट घेऊन त्यांच्याकडे राज्यस्तरीय समितीमार्फत याप्रकरणाची चौकशी व्हावी' अशी मागणी करणार आहे. स्थानिक समितीवर दबाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समितीसमोर मी माझे म्हणणे मांडणार नाही.
दरम्यान, राज्यस्तरीय तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेनेही देवरे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदन पाठवले आहे. या निवेदनातही त्यांनी राज्यस्तरावर महिला सदस्याचा समावेश असलेली राज्यस्तरीय स्वतंत्र समिती असावी, अशी मागणी केली आहे.