अहमदनगर - जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टेंपो पलटी झाल्याने कणसांनी भरलेली पोती महामार्गावर पडल्याचे दिसून आले. दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून अपघातस्थळी धाव घेण्यात आली. महामार्गावरील टेम्पो हटविण्याचे काम सकाळी सुरू होते.
शेतीमाल घेऊन निघालेले आयशर टेंम्पोचालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि अर्जुन युवराज गव्हाणे हे कन्नड येथून १२० मक्याच्या कणसांच्या गोण्या घेऊन संगमनेर मार्गे चाकणला जात होते. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ते पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात आले होते. त्यावेळी, टेम्पो पलटल्याने त्यातील कणसांच्या गोण्या महामार्गावर पडल्या. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढली असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी सावधानता बाळगत, वेगमर्यादा पाळत वाहन चालविण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.