आनंद भोईटे यांना तात्पुरता दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 06:20 PM2019-08-06T18:20:51+5:302019-08-06T18:21:48+5:30
निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ हत्याप्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवत तपासी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे़
अहमदनगर: निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ हत्याप्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवत तपासी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे़ या निर्णयाविरोधात तत्कालीन तपासी अधिकारी आनंद भोईटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निर्णयावर पूणर्विचार होऊन स्थगिती मिळण्याबाबत याचिका दाखल केली होती़ यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेत न्यायालयाने भोईटे यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी देत तात्पुरता दिलासा दिला आहे़
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बबन कवाद यांनी आधीच याबाबतचे कॅव्हेट दाखल केलेले होते त्यामुळे न्यायालयाने आधी कवाद यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर भोईटे यांना आपली बाजू मांडण्याची संधी न्यायालयाने दिली़ वराळ यांच्या हत्येचा तपास करताना बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे साक्षीदार दाखविण्यात आले आहेत़ अनेक निरापराधांना या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप करत बबन कवाद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ या गुन्ह्यात याचिकाकर्ते कवाद यांच्यावर आरोप आहे़ उच्च न्यायालयाने तत्कालीन तपासी अधिकारी आनंद भोईटे यांच्यावर थेट गुन्हे नोंदवा असे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत़