श्रीरामपूर : गंठण चोरीप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने श्रीरामपूर येथील चार आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपयाची दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कराळे यांनी सुनावली आहे.दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. सज्जाद गरीबशा पठाण उर्फ इराणी, मुश्ताफा फतेह इराणी, शब्बीर मिरीकन शेख उर्फ इराणी, अलिम शकील पठाण (चौघेही रा. इराणी गल्ली, वॉर्ड नं.१,श्रीरामपूर, जि.अ.नगर) व सलीम अब्दुल शेख (रा.भुसावळ, जि.जळगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.पुणे येथील भवानी पेठ परिसरातील नेहरु रस्त्यावरुन पायी जात असताना दुचाकी व चार चाकीमधून आलेल्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण ओरबडून नेले होते. ही घटना ३० मार्च २०१४ रोजी सकाळी ६.४५ वाजता घडली होती. याप्रकरणी खडक पोलिसांनी तपास करुन न्यायालयात वरील आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. शिक्षा झालेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुणे शहरात साखळी चोरी केल्याचे अनेक गुन्हे आहेत.