शिर्डी : एकनाथ शिंदे समर्थक आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिर्डीला साईबाबांच्या दरबारी साकडं घातलं आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना ही शिंदे गटालाच मिळणार असा विश्वास रामदास कदम यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी शिर्डीत रामदास कदम यांची खदखद पुन्हा एकदा बाहेर पडल्याचे दिसून आली आहे.
मुलगा योगश कदम आणि मला राजकारणातून संपवण्याच पाप उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी केले. मात्र त्यांना यश आल नाही. शिवसेना फोडण्यासाठी अनिल परब आणि उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. दापोली मतदार संघातून योगेश कदमला पराभूत करु शकणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात आले. खरंतर यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणे अपेक्षित आहे, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
रामदास कदम साईबाबांचे निस्सिम भक्त आहेत. नेहमीच ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आज ही ते परिवारा सोबत शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पक्षातीलच लोकांना संपविण्याचे काम केले आहे. बाळासाहेब ठाकरेंबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केल आहे, त्यांना आपला मुलगा आदित्य ठाकरेंसाठी संपवयाचे आहे, असा असा घाणाघाती आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही आले नसून ठाकरे व शिंदे गटांनी केलेले युक्तिवाद संपले आहेत. येत्या ३० जानेवारीला दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर लेखी निवेदन सादर करावयाचे आहेत. आयोगाच्या या लेखी परीक्षेत आता पास कोण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, काही महिन्यांपासून आयोगाकडे एकनाथ शिंदे गट व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवसेना व धनुष्यबाणावर आमचाच ताबा असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या १७ जानेवारीला अपूर्ण राहिलेला युक्तिवाद आज ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांनी पूर्ण केला. यानंतर त्याच गटाचे देवदत्त कामत यांनी पुन्हा युक्तिवाद केला. सादिक अलीचा संदर्भ शिवसेनेसाठी लागू होत नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.