अहमदनगर - तांबोळ (ता.अकोले) येथे १३ एप्रिलला मालती इनामदार यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या प्रयोगादरम्यान काही अपप्रवृत्तींनी धुडगूस घातल्याने साऊंड सिस्टिमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट आहेत, असा आरोप ज्येष्ठ कलावंत मालती इनामदार यांनी केला आहे.
मालती इनामदार यांचे पती मुसाभाई इनामदार हे मूळचे श्रीरामपूरचे आहेत. ते तमाशा मंडळ व्यवस्थापनाचे काम पाहतात. घडलेल्या घटनेमुळे ते अत्यंत दु:खी झाले आहेत. गेल्या ३० वर्षांत असा प्रकार प्रथमच घडला, असे मालती इनामदार व मुसाभाई इनामदार यांचे म्हणणे आहे.
गावातील तुळजाभवानी यात्रेनिमित्त बाळासाहेब माने यांच्या पुढाकारातून तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तमाशाचा खेळ सुरू असताना गावातील काही मंडळी स्टेजवर आली. त्यांनी आरडाओरडा आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यात्रा समितीच्या आयोजकांना धक्काबुक्की केली. तमाशाचा कॅमेरा तसेच साऊंड सिस्टिम आणि लाइटची तोडफोड केली. यात सुमारे १२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, असे इनामदार यांचे म्हणणे आहे.
अकोले पोलिसांनी या प्रकरणी सरपंच जयश्री सुधीर माने यांच्या फिर्यादीवरून तत्काळ गुन्हा दाखल केला. यात सुनील पवार, विलास मोहिते, राहुल चव्हाण, रोहिदास जाधव, जनार्दन साळुंखे, अनिल साळुंखे, तुषार चव्हाण, सूरज पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला.
तमाशाच्या खेळापूर्वी काही दिवस गावात ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यातील टोकाच्या राजकारणातून तमाशाच्या खेळामध्ये गोंधळ घातला गेला. मात्र, यात तमाशा कलावंतांची हानी झाली, असे मालती इनामदार यांचे म्हणणे आहे.