श्रीगोंदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे़ परंतु, रविवारी नागवडे कारखान्यांवर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, विखे, नागवडे, जगताप यांच्या एकत्रित बैठकीने नव्या चर्चेला उधान आले आहे़ राज्य साखर संघाचे अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने कारखान्यावर नेत्यांची मांदियाळी जमली होती.नागवडे साखर कारखान्याच्या विश्रामगृहात बंद खोलीत सुरुवातीला माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुजय विखे, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, दीपक नागवडे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आमदार राहुल जगताप यांना बोलविण्यात आले. बंद खोलीत काय चर्चा झाली हे समजले नसले तरी हर्षवर्धन पाटील हे भाजपाच्या उंबरठ्यावर आहेत. नागवडे हेही भाजपा नेत्यांशी संपर्कात आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीला विख-नागवडे यांच्यात संवाद घडवून आणला. त्यानंतर आमदार जगताप यांना बैठकीत बोलविले. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या शब्दांवर खा. सप्रिया सुळे यांना मदत केली. पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर मतदारसंघावर दावा केला़ परंतु, प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी स्पष्ट धोरण घेतले नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे. त्यावर पाटील यांनी भाजपाशी मैत्री करून इंदापूरमध्ये युती पुरस्कृत उमेदवारी करण्याची व्यूहरचना आखली आहे़ दरम्यान खासदार विखे यांच्या उपस्थित श्रीगोंद्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे श्रीगोद्यात नवे राजकीय समीकरणे जुळण्याची चिन्हे आहेत़