कर्जत : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरांनी गुरुवारी रात्री पळविली. शुक्रवारी सकाळी भविकांसह पुजारी आरती करण्यास गेल्यावर ही बाब लक्षात आली. हे वृत्त समजताच ग्रामस्थांनी गाव बंद पाळून घटनेचा निषेध व्यक्त केला.
निमगाव गांगर्डे येथील पोलीस पाटील अशोक गांगर्डे यांनी चाेरीची माहिती पोलिसांना दिली. मिरजगाव पोलीस दूरक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षक अमरजित मोरे व पोलिसांनी भेट देत पाहणी केली. नगर येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, त्यांना माग काढता आला नाही तसेच चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात ही दानपेटी फोडून त्यातील रक्कम घेऊन चोर पसार झाले. श्वानपथकाने शाळेच्या संरक्षक भिंतीपर्यंत माग काढला. परंतु, तेथून पुढे चोरटे वाहनाने पसार झाले.
चोरांना लवकरात लवकर शोधून जेरबंद करू, असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरजीत मोरे यांनी दिले.